लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : फळ, भाजीपाला पिकावर रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर झाला आणि पीक काढणीच्या वेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर फळे, भाजीपाला मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतो, अशी शक्यता कीटकशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कीडनाशकांचा वापर मर्यादेत करावा तसेच पीक काढणीच्या वेळी योग्य ती दक्षता घेण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी दिला.ताजी फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश असणे हे आरोग्यदायी मानले जाते; परंतु विषारी रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर या फळावर व भाजीपाल्याच्या पिकावर झाला असेल व विशेषत: या फळ व भाजीपाला पिकावर पीक काढणीच्या वेळी या रासायनिक कीडनाशकांचे अंश हे कीडनाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादेच्या बाहेर (एम.आर.एल.) शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला व फळे खाणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी, सुरक्षित अन्नासाठी कीडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून पीक काढणीसाठी प्रतीक्षा कालावधी कीटकशास्त्रज्ञांनी काढून दिलेला आहे. रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्यानंतर संबंधित पिकात संबंधित कीडनाशक फवारल्यानंतर पाळावयाचा प्रतीक्षा कालावधी साधारणपणे संबंधित कीडनाशकाच्या लेबलवर अथवा माहिती पत्रिकेवर दिलेला असतो. पीकवार कीडनाशकाच्या वापरानंतर कमाल अवशेष मर्यादा व पीक काढणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी याचा शेतकऱ्यांनी गरजेनुसार संदर्भ घ्यावा व आपल्या आहारात जाणाऱ्या विविध फळे व भाजीपाला पिकात कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील याची काळजी घ्यावी, असा सल्ला डवरे यांनी दिला.
फळे, भाजीपाला पिकावरील जादा फवारणी ठरतेय आरोग्यास अपायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 11:17 AM