कडक निर्बंधांमधून किराणा, डेअरी, भाजीपाल्याला सूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:36+5:302021-05-16T04:39:36+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान लागू केलेल्या कडक निर्बंधांना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. ...

Exemption of groceries, dairy, vegetables from strict restrictions! | कडक निर्बंधांमधून किराणा, डेअरी, भाजीपाल्याला सूट!

कडक निर्बंधांमधून किराणा, डेअरी, भाजीपाल्याला सूट!

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान लागू केलेल्या कडक निर्बंधांना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी एका आदेशान्वये २० मेपर्यंत मुदतवाढ दिली. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून किराणा, डेअरी, भाजीपाला, फळविक्रेते, पिठाची गिरणी व रेशन दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सूट दिली. उर्वरित अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार असून, त्यांना पार्सल सुविधा पुरविता येणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध २० मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहणार आहे. मात्र, या कालावधीत किराणा दुकाने, भाजीपाला व फळेविक्री, डेअरी, पिठाची गिरणी, रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहेत. भाजीपाला दुकाने व फळे विक्रेत्यांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरूपात ठिकाणे निश्चित करून द्यावीत व याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. याव्यतिरिक्त सर्व दुकाने तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (मांस, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगर परिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गट विकास अधिकारी यांच्या स्तरावरून करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान, १५ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला, डेअरी, विविध प्रकारच्या फळांच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

०००००००००००००

बॉक्स

हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा सुरू राहणार !

हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. दूध संकलन केंद्र व घरपोच दूध वितरणास सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा राहील.

००००००००००००

बॉक्स

ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू !

ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील. स्थानिक दुकानदार, हॉटेलामार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था करतील. या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

०००००००००००००

बॉक्स

कृषी सेवा केंद्र, बाजार समित्या बंदच !

सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरू राहील. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत, तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील. या प्रक्रियेचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावर सोपविली आहे.

०००००००००००

बॉक्स

सलून, ब्युटीपार्लर पूर्णत: बंद !

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही.

००००००

बॉक्स

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल मिळणार!

सर्व पेट्रोल पंपांवर या आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबींकरताच पेट्रोल देण्यात यावे. याव्यतिरिक्त महसूल विभाग, डॉक्टर्स, विद्युत विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, नगरपालिका विभाग, पोलीस कर्मचारी, बँक व पोस्ट कर्मचारी, कोषागार कार्यालय, माल वाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. तसेच पत्रकार, दूध वितरक, मेडिकलधारक, भाजीपाला व फळ विक्रेते, किराणा दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन केंद्र चालक, कृषी व गॅस एजन्सीधारक यांना घरपोच सेवेची मुभा देण्यात आली असल्याने पेट्रोल पंपांवरून पेट्रोल, डिझेल भरण्याकरिता मुभा राहील.

०००००००

बॉक्स

मंगल कार्यालये बंदच राहणार !

सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल पूर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पद्धतीने घरगुती स्वरूपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणूक, जेवणावळी, बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्नाला केवळ १५ व्यक्ती उपस्थित राहण्याची परवानगी असेल व लग्नसोहळा २ तासांत उरकणे बंधनकारक आहे. बेकायदेशीररीत्या लग्नसोहळा पार पडणार नाही, याची संबंधित ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीला दक्षता घ्यावी लागणार आहे. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यावर सोपविली आहे.

००००००००

बॉक्स

सेतू केंद्र व दस्त नोंदणी बंद

सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात वेगवेगळी प्रमाणपत्रे व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ इन-सिटू कामकाज सुरू राहील. याबाबतची जबाबदारी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापन यांच्यावर राहणार आहे.

००००

Web Title: Exemption of groceries, dairy, vegetables from strict restrictions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.