नगरपरिषद,नगरपंचायत स्थापनेच्या उद्घोषणेस मुदतवाढ

By admin | Published: June 1, 2014 12:16 AM2014-06-01T00:16:19+5:302014-06-01T00:23:28+5:30

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक उद्घोषणेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

Expansion of the anniversary of the establishment of Nagarparishad, Nagar Panchayat | नगरपरिषद,नगरपंचायत स्थापनेच्या उद्घोषणेस मुदतवाढ

नगरपरिषद,नगरपंचायत स्थापनेच्या उद्घोषणेस मुदतवाढ

Next

वाशिम : ग्राम पंचायतींद्वारा स्थानिक कारभार बघितल्या जात असलेल्या, राज्यातील ७८ तालुका मुख्यालयी नगर परिषद व नगर पंचायती स्थापन करण्यासाठी, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक उद्घोषणेस मुदतवाढ देण्यात आली आहे. तालुका मुख्यालयी नगर परिषद वा नगर पंचायती स्थापन करण्यासाठी, राज्य शासनाने गत १ मार्च २0१४ रोजी, अधिसूचनेद्वारे प्राथमिक उद्घोषणा प्रसिद्ध केली होती; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे काही जिल्ह्यात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही करता येणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे सदर कार्यवाही पूर्ण करण्याच्या दृष्टीने, सदर उद्घोषणा प्रसिद्ध करणे व हरकती, सूचना मागविण्यासाठी राज्य शासनाने ३0 जूनपर्यत मुदतवाढ दिली आहे. राज्यात अनेक तालुक्यांच्या मुख्यालयी, लोकसंख्या वाढल्यामुळे गावांचा विस्तार होऊनही, त्या गावांचा कारभार ग्राम पंचायतींच्याच हाती असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, त्या गावांचा विकास खुंटला आहे. त्यामुळे अशा तालुका मुख्यालयी नगरपरिषदा किंवा नगरपंचायती स्थापन करण्याची बाब, बरेच दिवसांपासून शासनाच्या विचाराधीन होती. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने, राज्य शासनाने ३0 मे रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात आवश्यक ती अधिसूचना प्रसिद्ध करुन, विहित कालावधीत प्राथमिक उद्घोषणेवर हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही करण्यास ३0 जूनपर्यत मुदतवाढ दिली आहे. तशी कार्यवाही विहित मुदतीत करण्याचे निर्देशही सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. सदर उद्घोषणेच्या प्रती नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्र म्हणून जाहीर करावयाच्या क्षेत्रात ठळक ठिकाणी लावण्याचेही सूचित करण्यात आले आहे.राज्यात नव्याने नगर परिषद, नगर पंचायत स्थापन करावयाचे प्रस्तावित असलेल्या तालुका मुख्यालयांमध्ये, जळगाव जिल्ह्यातील बोदवड व मुक्ताईनगर, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव-वडफळ्या-रोशमाळ व अक्कलकुवा, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव व फुलंब्री, जालना जिल्ह्यामधील धनसावंगी, बदनापूर, मंठा व जाफ्राबाद, परभणी जिल्ह्यामधील पालम, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ, बीड जिल्ह्यातील शिरुर, वडवानी, पाटोदा व आष्टी, लातूर जिल्ह्यामधील जळकोट, रेणापूर, चाकूर, देवणी(बु) व शिरूर अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा(बु) व वाशी, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर व नायगाव, अमरावती जिल्ह्यामधील भातकुली, नांदगाव खंडेश्‍वर, धारणी व तिवसा, अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी, वाशिम जिल्ह्यामधील मानोरा व मालेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, झरी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव व कळंब, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा, नागपूर जिल्ह्यामधील हिंगणा, भिवापूर, कुही व पारशिवणी, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, मोहाडी, साकोली व लाखनी, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, सेलू, कारंजा व आष्टी, गोंदिया जिल्ह्यामधील सडकअर्जुनी, अर्जुनी (मोरगाव), गोरेगाव व आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना, सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, नागभीड, चिमूर व सिंदेवाही आणि गडचिरोली जिल्ह्यामधील मूलचेरा, कोरची, भामरागड, धानोरा, सिरोंचा, कुरखेडा, एटापल्ली, आरमोरी, चार्मोशी व अहेरी या ग्रामपंचायत असलेल्या गावांचा समावेश आहे.

Web Title: Expansion of the anniversary of the establishment of Nagarparishad, Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.