मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ; ७ मार्चपर्यंत करता येणार आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:22 PM2018-03-01T14:22:21+5:302018-03-01T14:22:21+5:30
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळावा यासाठी करावयाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला आता ७ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळावा यासाठी करावयाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला आता ७ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १०२ खासगी शाळांची नोंदणी झालेली आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत कोट्यातून प्रवेश देण्यासाठी सुरूवातीला २८ फेब्रुवारी अशी प्रवेश अर्जाला मुदत देण्यात आली होती. अंतिम मुदतीपर्यंत अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या मोफत प्रवेशासाठी अर्ज दाखल करता आले नाहीत. या पृष्ठभूमीवर प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होताच, शिक्षण विभागाने ७ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ११७३ जागांसाठी केवळ ८७५ अर्ज दाखल झाले होते.
दरम्यान, आॅनलाईन प्रवेश अर्जासंदर्भात पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाशिम येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातही मदत केंद्राची स्थापना केली आहे. येथे आवश्यक ते मार्गदर्शन करण्याबरोबरच पालकांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. पालकांनी ७ मार्चपर्यंत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.