वसुमना पंत या मूळच्या उत्तराखंड राज्यातील. मात्र, आई-बाबा आणि सासू-सासरे हे दिल्लीत स्थायिक झालेले आहेत. गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, साधारणत: सहा, सात महिन्यांपूर्वी त्या दिल्लीला जाऊन आई-बाबा, सासू- सासरे यांना भेटून आल्या. तेव्हापासून गावाकडे जाता आले नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाशिम जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा अधिक फैलाव होऊ नये, म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, अंमलबजावणी या संदर्भात आरोग्य विभाग, पंचायत विभाग, गटविकास अधिकाऱ्यांकडून वारंवार आढावा घेण्यासाठी तालुकास्तर व ग्रामीण भागातही त्या दौरे करीत आहेत. माहेर व सासर अशा दोन्ही कुटुंबांतील काही सदस्य पॉझिटिव्ह असतानाही, कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांना गावाकडे जाणेही कठीण झाले आहे. केवळ फोनद्वारेच आई-बाबा, सासू-सासरे यांची विचारपूस करणे, काळजी घेणे, मानसिक आधार देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. आई-बाबा, सासू-सासरे यांनाही वाटते की, आपल्या पाल्यांनी अशा संकटसमयी आपल्या जवळ राहावे, परंतु त्याच क्षणी कोरोनाच्या काळात पाल्यांचे प्रशासकीय कर्तव्यही महत्त्वाचे असल्याने आई-बाबा, सासू-सासरे हे पाल्याची मनस्थिती, द्विधास्थितीतही समजून घेतात.
००००
आप कब आ रहे हो...!
कोरोनामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांना सात महिन्यांपासून गावाकडे जाता आले नाही. त्यामुळे साहजिकच आई-वडील, सासू-सासरे यांनाही पाल्याची काळजी वाटते. ‘आप कब आ रहे हो!’ असा प्रश्नही कधी-कधी आई-वडील, सासू-सासऱ्यांकडून उपस्थित केला जातो. यावर ‘बस्स, कोरोना का सिच्युएशन कमी होने दो, जल्दी ही आयेगे, आप अपना ख्याल रखो’ असे म्हणत भावनांना आवर घालावा लागतो.
००००००००
पतीही ‘आयएएस’!
मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे पती अविशांत पंडा हे आयएएस असून, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात दोघेही आपापल्या जिल्ह्यात मु्ख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या काळात इतरांप्रमाणे सध्या आयएएस अधिकाऱ्यांना कुटुंबासाठी फारसा वेळ देणे शक्यच होत नाही.
००००००००००००