शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:42 AM2021-03-16T04:42:00+5:302021-03-16T04:42:00+5:30

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. तशी ती यंदाही झालेली आहे. मात्र, अनेक उपवल तरूण - ...

Farmer husband nako gam bai | शेतकरी नवरा नको गं बाई

शेतकरी नवरा नको गं बाई

Next

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. तशी ती यंदाही झालेली आहे. मात्र, अनेक उपवल तरूण - तरूणींचे विवाह जुळविताना अडचणी निर्माण होत आहेत. विवाह जुळविणाऱ्या वर-वधू सुचक मंडळांकडे मध्यस्थांमार्फत विशेषत: तरुणांचे ‘बायोडाटा’ जमा होत आहेत. मात्र, विवाहोत्सुक मुलींसह त्यांच्या पालकांच्याही अपेक्षा वाढल्याने त्यांना हवा तसा जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांना तर हल्ली ‘डिमांड’च नसल्याची एकंदरित स्थिती आहे. मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असल्यास तिला शक्यतो पुणे, मुंबईत गलेलठ्ठ नोकरी असलेलाच नवरा हवा आहे; तर डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली व त्यांचे पालक डॉक्टरच शोधत आहेत. शासकीय, निमशासकीय नोकरी करणाऱ्यांनाही यामुळे विवाह जुळविताना अडचण निर्माण झालेली आहे.

...........

सर्वाधिक मागणी डॉक्टर, अभियंत्यांना

गेल्या काही वर्षांत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच पालकांकडून खुली सूट मिळत असल्याने बहुतांश मुलींनी परगावी जाऊन डॉक्टर, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

त्यापैकी ज्या मुलींचे विवाहाचे वय झाले, त्यांच्यासाठी वराचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, डॉक्टर किंवा अभियंताच आणि तोदेखील चांगल्या पॅकेजचा, अशी अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी, शेतमजूरच नव्हे; तर शासकीय व निमशासकीय नोकरी करीत असलेल्या विवाहोत्सुक वराला डॉक्टर किंवा अभियंता मुलगी मिळणे पूर्णत: अशक्यच झालेले आहे.

..........

अटी मान्य असतील तरच बोला...

पूर्वी वधू मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे संपूर्ण अधिकार पालकांनाच असायचे. पालक म्हणतील त्या मुलासोबत मुलीला विवाह करावा लागत असे. विशेषत: घरी शेती किती आहे आणि ती ओलिताखालची आहे किंवा कोरडवाहू, हे पाहिले जायचे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. शक्यतो शेतकरी नवरा कुणालाच नको आहे. काही मुलींकडून तर एकत्रित कुटुंबही नको आहे. मुलगा मुंबई, पुण्यात राहायला हवा. अशा अटी मान्य असतील तरच पुढची बोलणी होत असल्याचेही प्रकार घडत आहेत.

..........

मराठा समाजातील विवाहोत्सुक वर-वधूंचे विवाह जुळवून देण्याकरिता अपेक्षित सर्व प्रयत्न केले जात आहेत. मुलांच्या तुलनेत आता मुलींकडून ‘डिमांड’ ठेवल्या जात आहेत. विवाह नाही जुळला तरी चालेल. पण अटी पूर्ण व्हायलाच हव्या, असाही अट्टहास वधुपित्यांकडून धरला जातो.

- राजेश दहातोंडे, कारंजा

........

ब्राह्मण समाजात उच्च शिक्षित मुलींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेले आहे. त्यांना त्यांच्याप्रमाणेच शिकलेला व चांगल्या पगाराच्या नोकरीवर असलेलाच नवरा हवा आहे. त्यात गैर नाही. मात्र, यामुळे कमी शिकलेल्या व साधी नोकरी असलेल्या मुलांचे विवाह जुळणे अशक्य झाले आहे.

- श्याम संघवई, वाशिम

..........

विरशैव लिंगायत समाजातही विवाह जुळविण्याचा प्रश्न सध्या गंभीर झालेला आहे. अधिकांश मुलींना शासकीय नोकरीत चांगला पगार असलेलाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे. यामुळे कमी शिकलेली व शेतकरी असलेली मुले प्रतीक्षेत आहेत. ही परिस्थिती सध्यातरी बदलणार नसल्याचे दिसून येत आहे.

- का. शि. लाव्हरे, वाशिम

Web Title: Farmer husband nako gam bai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.