प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध!
By admin | Published: June 1, 2017 01:15 AM2017-06-01T01:15:24+5:302017-06-01T01:15:24+5:30
काम बंद ठेवण्याची मागणी : रस्त्याचे काम निकृष्ट
लोेकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : किन्ही घोडमोड मार्गे पर्यायी म्हणून केला जाणारा रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून, रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.
२००५ -०६ पासून मंजुरात असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला मागील दोन महिन्यांपासून गती मिळाली आहे. सदर काम थंड बस्त्यात असताना लोकमतने पाठपुरावा करून सदर कामे त्वरित होण्यासाठी पुढाकार घेतला होता. याची दखल अधिकाऱ्यांनी घेऊन कामाला गती दिली होती. सद्यस्थितीत पांगरखेडा ते चांडस गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम जोरात सुरू आहे; मात्र बुडीत क्षेत्रात गेलेल्या शिरपूर मिर्झापूर रस्त्याला पर्याय म्हणून किन्ही घोडमोड मार्गे केलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविल्या जात आहे.
सदर होत असलेल्या कामाच्या निषेधार्थ ३० मे पासून मिर्झापूर, घाटावासीयांनी प्रकल्पाच्या कामाला विरोध करून काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. ३१ मे रोजीसुद्धा सदर कामावर जावून ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे शिरपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात कॅनॉलचे खोदकाम पाच ते सात वर्षांपासून करण्यात आले; परंतु त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. मोबदला त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
‘त्या’नंतरच कामास सुरुवात करण्याची मागणी
२००५-०६ मध्ये मिर्झापूर लघु प्रकल्पाला मंजुरात मिळून २००९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यासाठी २१० हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली. या शिरपूर मिर्झापूर रस्त्याचा काही भाग प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात समाविष्ट होणाार असल्याने मिर्झापूर घाटावासीयांनी पर्यायी रस्त्याची मागणी केली. याकडे तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पर्यायी रस्त्यासाठी त्यावेळी दोन्ही गावाच्या नागरिकांनी आमरण उपोषणही केले होते. त्याची दखल घेऊन दोन वर्षापूर्वी मिर्झापूर-किन्ही घोडमोड हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला; परंतु हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने समोरासमोर दोन वाहने आले की वाहन काढणे शक्य नसल्याने व केलेले रस्त्याचे काम अतिशय थातूरमातूर असल्याने व संथ गतिने सुरु केलेल्या प्रकल्पाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच ते काम थांबविले आहे. रस्ता चांगला व मोठा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत असून, त्यानंतरच कामास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.