वॉटर कप स्पर्धेंतर्गत माती परिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:43 PM2018-04-16T14:43:34+5:302018-04-16T14:43:34+5:30
वाशिम: पाणी फाऊंंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये सहभागी गावांतून माती परिक्षणाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
वाशिम: पाणी फाऊंंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये सहभागी गावांतून माती परिक्षणाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील मिळून ३ हजारांहून अधिक शेतकºयांनी विविध संस्थांकडून माती परीक्षण करून घेतले आहे.
खरीपाचा हंगाम अवघा दीड महिन्यावर आला असून, या हंगामासाठी बळीराजाचे नियोजन सुरु झाले आहे. पण या तयारीपूर्वी शेतातील मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. शेती करताना अनेक प्रकारच्या खतांचा वापर केला जातो, तसेच पिकांवर वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी केली जाते. या सगळ्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होते, कस खालावतो. याचा परिणाम माती्च्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. आपल्या शेतजमिनीतील मातीचे परिक्षण करुन घेतल्यास आपल्याला मातीची गुणवत्ता कळू शकते. यासाठी मातीचा नमुना घेणे गरजेचे आहे. त्यातच पाण्याचा मातीशी येत असल्याने वॉटर कप स्पर्धेत माती परिक्षणाचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी संबंधित गावाला ५ गुणही मिळतात. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावे शेतामधील माती परिक्षणाला महत्त्व देत आहेत. वॉटर कप स्पर्धेच्या प्रत्यक्ष सुरुवातीपूर्वीच माती परीक्षणासाठी नमुण्यांचे संकलन सुरू झाले होते. या अंतर्गत कारंजा तालुक्यात २ हजारांहून अधिक मातीचे नमुने संकलित करून त्यांची तपासणी करण्यात आली, तर मंगरुळपीर तालुक्यातही मातीचे १५०० हून अधिक नमुने संकलित करण्यात आले आहेत.