शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 04:23 PM2021-02-04T16:23:21+5:302021-02-04T16:23:35+5:30
Cotton Purchasing News शासकीय खरेदी केंद्रांना यंदा १ फेब्रुवारीपर्यंत केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटलच कापूस खरेदी करणे शक्य झाले.
वाशिम: खासगी बाजारात कापसाचे दर हमीदरापेक्षा अधिक झाल्याने शेतकºयांनी शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ केली आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांना यंदा १ फेब्रुवारीपर्यंत केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटलच कापूस खरेदी करणे शक्य झाले असून, आता सहापैकी एकाही केंद्रावर क्विंटलभरही कापसाची आवक होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकºयांना वारंवार निसर्गाच्या अनियमितेचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान केले असतानाच बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यात शासनाने मध्यम धाग्याच्या कपाशीला प्रती क्विंटल ५६१५, तर लांब धाग्याच्या कपाशीला ५७२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषीत केले असताना बाजारात अवघ्या ५००० ते ५२०० रुपये प्रती क्विंटल दराने कपाशीची खरेदी केली जात होती. त्यामुळे हताश झालेल्या शेतकºयांकडून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. शेतकºयांच्या मागणीची दखल घेऊन सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली. त्यात सुरुवातीला मंगरुळपीर, अनसिंग येथे, तर त्यानंतर कारंजा येथे दोन, कामरगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी एक केंद्रही सुरू केले. कारंजा, मंगरुळपीर आणि अनसिंग येथील केंद्रावर सुरुवातीला विक्रमी आवक झाली. त्यानंतर मात्र खासगी बाजारात कपाशीचे दर वाढू लागल्याने शासकीय केंद्रांकडे शेतकºयांनी पाठ करणे सुरू केले. परिणामी, गेल्या पाच दिवसांपासून शासकीय केंद्रावर एक क्विंटल कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही, तर १९ नोव्हेंबर २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यानच्या काळात सर्व शासकीय केंद्रांवर मिळून केवळ १ लाख १४ हजार ८३५ क्विंटल कापसाची खरेदी होऊ शकली आहे.