ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, पिकली तर शेती, नाहीतर शेतकऱ्यांची माती, असाच प्रकार कापूस पिकाच्या संदर्भात सुरू आहे. कपाशी पीकअळीमुळे अडचणीत आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दोन दशकांपूर्वी कापूस पिकाच्या भावावर सोन्याचे भाव ठरविले जात होते. कापसाला अडीच हजार रुपये क्विंटल भाव असेल, तर सोन्याच्या तोळ्याचा भावही तेवढ्याच तुलनेत असायचा, असे वृद्ध शेतकरी सांगतात. मात्र, आता सोन्याचे दर प्रति तोळा ५० हजार रुपये असून, कापसाला केवळ ६ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहेत. सरकारने मागच्या पंचवार्षिकमध्ये हमीभावावर ५० टक्के वाढीव नफा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली व शेतमालाचे हमीभाव वाढविले नसल्याने जिथल्या तिथेच आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. त्यात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बोंडअळी रोग आल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या वर्षीही बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचा वेचानंतर पऱ्हाटी उपटून टाकली होती, यामध्ये बियाणे, रासायनिक खते, फवारणी आदी लाखो रुपयांचा खर्च मातीत गेला व शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
-------------
वाढत्या खर्चाचा परिणाम
दरवर्षी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधे, मजुरांची मजुरी, डीझेल, पेट्रोल आदींचे दर वाढत आहेत, त्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करणे, मजुरांकडून कापणी करणे, तसेच पिकाला खते देणे व कीटकनाशकांचा वापर करणेही खर्चिक झाले असल्याने, शेतकरी कपाशीच्या पिकाकडे पाठ करू लागले आहेत.