लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचे आदेश लागू आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे केले जात असले तरी काही नागरिक मात्र अद्यापही कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात गंभीर नसल्याचे ७ एप्रिल रोजी बँकांसमोरील गर्दीवरून दिसून आले. येथे सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळला जात नाही.रिसोड : रिसोड येथे ७ एप्रिल रोजी राष्ट्रीयकृत बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.१५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता बँकांचा अपवाद वगळता उर्वरीत प्रत्येक यंत्रणेकडून घेतली जात आहे.ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी योग्य ती खबरदारी बँकांकडून घेण्यात आली नसल्याचे ७ एप्रिल रोजी ग्राहकांच्या गर्दीवरून दिसून आले. रिसोड येथील बँक आॅफ इंडिया शाखेसमोर सकाळी ११ वाजता ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. तसेच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा रिसोड, अलाहाबाद बँक, बँक आॅफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेसमोर ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांसमोर व बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याची माहिती मिळताच ठाणेदार अनिल ठाकरे यांनी बँकमध्ये जाऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले. ग्राहकांना नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवूनच बँकेचे कामे करावे व विनाकारण गर्दी करू नये अशा सूचना दिल्या तसेच बँकेसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.अनसिंग : अनसिंग येथेही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ७ एप्रिल रोजी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. येथे सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळण्यात आला नाही.(प्रतिनिधी)
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; बँकांसमोर नागरिकांची गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:17 AM