नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:17+5:302021-05-21T04:43:17+5:30
वाशिम : कडक निर्बंधांच्या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी ...
वाशिम : कडक निर्बंधांच्या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर राहून आवश्यक कार्यवाही करावी. परवानगी नसलेली दुकाने सुरु असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २० मे रोजी दिले. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे बैठकीत सहभागी होते. तालुकास्तरीय यंत्रणांनी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी नियोजन करावे. ई-पासशिवाय कोणालाही जिल्ह्यात येण्याची अथवा जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या दरम्यान सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही दुकाने, अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परवानगी नसलेली दुकाने सुरु असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर म्हणाले, जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ करणे आवश्यक आहे. याकरिता तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व संबंधितांना सूचित करून त्याअनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
०००
बालरोगतज्ज्ञांची बैठक घेण्याची सूचना
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तालुक्यातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच नियमित लसीकरण, पोषण आहार वितरण यामध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
०००००
चाचण्यांची माहितीही अपलोड करावी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविणे आवश्यक आहे. तसेच या चाचण्यांची माहिती त्याच दिवशी पोर्टलवर अपलोड करावी. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांसाठी गावपातळीवर आयसोलेशन सेंटर उभारण्याबाबत तालुकास्तरावर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
००००
... तर दुकाने सील करावी
निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, ज्या बँकांमध्ये गर्दी होत आहे, तेथे टोकन पद्धत सुरू करण्याबाबत नियोजन करावे. तसेच नियमांचे सतत उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाधारक, दुकानदारांवर गुन्हे दाखल करून सदर दुकाने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती घोषित असेपर्यंत सील करावी, अशा सूचनाही हिंगे यांनी दिल्या.