वाशिम : जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत विविध विभागातील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांची निवड यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर झळकली आहे.गत काही वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरभरती बंद असल्याने पात्र उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत होता. यासंदर्भात अनुकंपाधारक संघटनेने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध टप्प्यात आंदोलनही केले होते. आता जिल्हा परिषदेने अनुकंपा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहिर केल्याने अनुकंपा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेंंतर्गत विविध विभागातील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी डिसेंबर महिन्यात कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी प्रतीक्षा यादीनुसार तात्पुरती निवड यादी तयार केली असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच सामान्य प्रशासन विभागामध्ये निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुकंपा प्रतीक्षा यादीमधील कर्मचाऱ्याच्या पात्र नियुक्ती, निवडीबाबत कुणाचे आक्षेप असल्यास त्यांना १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात आवश्यक त्या दस्तऐवजासह जिल्हा परिषदेत आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. या आक्षेपाबाबत निराकरण करून नियमानुसार पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी सांगितले.
अखेर अनुकंपा उमेदवारांच्या पदभरतीचा निघाला मुहुर्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 6:35 PM