सन २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने अनेक क्षेत्र प्रभावित झाले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गतवर्षातील मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. सरकारी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेवरील शिक्षकांना नियमित वेतन असल्याने त्यांना आर्थिक संकटाशी दोन हात करण्याची वेळ आली नाही. परंतु, कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, खासगी कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक कोंडीतून जावे लागले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. त्यामुळे कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित व इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याना मोठा दिलासा मिळाला होता. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची भीती विनाअनुदानित, कॉन्व्हेंटच्या शिक्षकांमधून वर्तविण्यात येत आहे. शासनाने एखादे पकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
विनाअनुदानित शिक्षकांसमोर पुन्हा आर्थिक संकट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:42 AM