पहिल्याच पावसात शेलुबाजार-मंगरुळपीर रस्ता जाम; बस फसल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:44 PM2019-06-23T15:44:17+5:302019-06-23T16:29:21+5:30
शेलुबाजार येथे अडाण नदीवर पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर एसटी बस फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
लोकमत न्युज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : अकोला-मंगरुळपीर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. शनिवारी आलेल्या पावसामुळे या मार्गावर शेलुबाजार येथे अडाण नदीवर पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर एसटी बस फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. संबंधित कंत्राटदाराने पावसाळा लक्षात घेऊन पर्यायी रस्ता मजबूत न केल्याने या ठिकाणी चिखल तयार झाला. यामुळेच हा प्रकार घडला. पुढे ही समस्या येऊ नये म्हणून कंत्राटदाराने त्वरीत पर्यायी रस्ता मजबूत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलुबाजार येथील अडाण नदीवरील पूर्वीचा पूल तोडून नवा पूल करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून पुलाच्या बाजुलाचा तात्पुरता पर्यायी रस्ता करण्यात आला. तथापि, या रस्त्याला खडीकरण करून मजबूत करण्यात आले नाही आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपही टाकण्यात आले नाही. अशातच २२ जून दुपारी शेलूबाजार परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे खोलगट भागात असलेल्या या मार्गावर पहिल्याच पावसात पाणी साचून चिखल तयार झाला आणि या रस्त्यावरुन वाहने घसरू लागली आणि फसूही लागली. त्यात बंद पडलेली एक बस मंगरुळपीर येथून दुसºया एसटी बसच्या आधाराने या मार्गावरून नेण्यात येत असताना चिखलात फसल्या. त्यामुळे नदीच्या पुलापासून ते शेलुबाजार चौकापर्यंत वाहनांची रांगच लागली होती. अखेर जेसीबीला बांधून चिखलात फसलेल्या दोन्ही बस बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरु असतानाही वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याला तयार नाही.
मागील सहा महिन्यांपासून या मार्गावरुन मार्गक्रमण करणाºया वाहनाधारकांना धुळीचा सामना करावा लागला आणि आता याच वाहनाधारकांना कंत्राटदार व संबधीत अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे वाहतूक खोळंब्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढे यामुळे गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन प्रशासनाला दखल घेण्याच्या सुचना करण्याची मागणी जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.