जलकुंभात मृत कुत्रा आढळल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:46 PM2019-06-22T17:46:36+5:302019-06-22T17:46:42+5:30
याप्रकरणी २२ जून रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वाईगौळ येथील २८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या जलकुंभात २० जून रोजी मृतावस्थेतील कुत्रा आढळून आला. या गंभीर प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त झाला. दरम्यान, मजिप्राचे शाखा अभियंता जनार्दन खराटे यांनी याप्रकरणी २२ जून रोजी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले.
मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एक जलकुंभ बांधण्यात आला असून, त्यातील पाणी ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे सोडले जाते. गुरूवारी सकाळी जलशुद्धीकरण केंद्रावरील जलकुंभात काळ्या रंगाचा कुत्रा मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकºयांनी थेट तहसील कार्यालय गाठून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त करित तक्रार दाखल केली. संबंधित दोषींविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. त्याची दखल घेवून मजिप्राचे शाखा अभियंता खराटे यांनी मानोरा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविचे कलम २७०, २७७ नुसार गुन्हे दाखल केले.