धर्मगुरू रामराव महाराज यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 05:26 PM2020-10-31T17:26:12+5:302020-10-31T17:28:57+5:30

Sant Ramrao Maharaj News रविवार १ नोव्हेंबर रोजी बंजारा काशी पोहरादेवी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Funeral on Dharmaguru Ramrao Maharaj on Sunday | धर्मगुरू रामराव महाराज यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार

धर्मगुरू रामराव महाराज यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार

googlenewsNext

मानोरा (वाशिम) : संत सेवालाल महाराज यांचे वंशज, बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे लिलावती रुग्णालय मुंबई येथे शुक्रवारी रात्रीदरम्यान देहावसान झाले असून, रविवार १ नोव्हेंबर रोजी बंजारा काशी पोहरादेवी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गुरुपौर्णिमेला ७ जुलै १९३५ रोजी जन्मलेल्या रामराव महाराजांनी कोजागिरी पौर्णिमेला रात्री ११ वाजतादरम्यान मुंबई येथील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. महाराजांचा ओढा बालपणापासूनच अध्यात्म, मानव कल्याणाकडे असल्यामुळे आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन डॉ. रामराव महाराज यांनी केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील आदिशक्ती माता जगदंबा तथा क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांचे पुजारी व मठाधिपती म्हणून संपूर्ण भारत आणि विदेशातही रामराव महाराजांना मान्यता होती. मागील एका वर्षापासून प्रकृती अस्थिर असतानाही बंजारा समाजाचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी आजारी अवस्थेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट यावर्षी मार्च महिन्यात घेतली होती. दरम्यान, संत रामराव महाराज यांचे पार्थिव शनिवारी रात्री पोहरादेवी येथे येत असून, रविवारी पोहरादेवी येथे त्यांच्यावर दुपारी १२.३० वाजतादरम्यान अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी कुटुंबाकडून तसेच भाविकांकडून पूजाआरती होणार आहे. दरम्यान पोहरादेवीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासन तेथे तळ ठोकून आहे. गर्दी टाळण्यासाठी पाेलीसांच्यावतिने पाेहरादेवीमध्ये नाकाबंदी सुध्दा करण्यात आली आहे.
 
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या शोक संवेदना
धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

Web Title: Funeral on Dharmaguru Ramrao Maharaj on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम