वाशिम जिल्ह्यात सहा तालुके असले तरी वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा या चारच तालुक्यात एस. टी.चे आगार आहेत. मालेगाव आणि मानोरा येथे बसस्थानक असले तरी या बसस्थानकांचा कारभार अनुक्रमे वाशिम आणि मंगरुळपीर येथील आगारातूनच चालतो. त्यात या चारही आगारात मिळून एकूण बसगाड्यांची संख्या १८० आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर आता एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीला मोठा प्रतिसाद लाभत आहे. तथापि, जिल्ह्यातील चारही आगारांकडे बसगाड्यांची संख्या कमी असताना काही बसगाड्या नादुरुस्त असल्याने फेऱ्यांची जुळवाजुळव करताना आगारप्रमुखांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यात रस्त्यावर बसगाड्या बंद होण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
आगारनिहाय बसगाड्यांची स्थिती
आगार एकूण बस नादुरुस्त
वाशिम ४८ ०४
कारंजा ४० ०४
मंगरुळपीर ४६ ०६
रिसोड ४४ ०४
------------------------------
एकूण १७८ १८
----------------------------
थंडीत, उन्हातान्हात प्रवाशांचा खोळंबा
एस. टी. महामंडळाच्या विविध आगारांतील बसगाड्या काही वेळा पुरेशी तपासणी करून मार्गावर सोडल्या जात नाहीत. त्यात टायरची स्थिती चांगली नसते. अशावेळी मार्गावर धावत असलेली बस तांत्रिक बिघाडामुळे अचानक मध्येच बंद पडते किंवा टायर पंक्चर होऊन थांबते. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत आहे, तर रात्री थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोणत्याही वेळी बस बंद पडली, तर प्रवाशांना भर रस्त्यावर थंडीवाऱ्यात किंवा उन्हातान्हात ताटकळत त्रास सहन करीत दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागते.
-------------
कोट: आमच्या आगारात एकूण ४४ बसगाड्या आहेत. बसगाड्यांची संख्या कमी असल्याने वरिष्ठस्तरावर ४ गाड्यांची मागणी केली आहे. शिवाय ४ गाड्या नादुरुस्त असल्याने विभागीयस्तरावर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी पाठविल्या आहेत. बस रस्त्यात बंद पडल्यास चालक, वाहकांच्या सुचनेनुसार तत्काळ दुसरी बस संबंधित ठिकाणी पाठविली जाते.
-विनोद इलामे,
आगारप्रमुख, वाशिम
------------
कोट: आमच्या आगारात ४० बसगाड्या असून, ३६ बसगाड्यांची स्थिती चांगली आहे, तर ४ बसगाड्या दुरुस्तीसाठी पाठविल्या आहेत. शिवाय काही नव्या गाड्यांची मागणीही केली आहे. रस्त्यावर बस बंद पडण्याचे प्रकार सहसा घडत नाहीत; परंतु असा प्रकार घडला, तर पर्याय म्हणून लगेच दुसरी बस संबंधित ठिकाणी पाठवून प्रवाशांची अडचण दूर केली जाते.
- मुकुंद न्हावकर,
आगारप्रमुख, कारंजा
---------------
कोट: एसटी महामंडळाच्या बसगाड्या मार्गात बंद होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. शुक्रवारी नागपूर आगाराची एक बस वाशिमकडे जात असताना टायर फुटल्याने मध्येच बंद पडली. या बसचे टायर जीर्ण असल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे बसमधील ६०पेक्षा अधिक प्रवाशांना पाऊण तास रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले.
-गजानन राठोड,
प्रवासी,