मंगरुळपीर: शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी पालिकेकडून सोनल प्रकल्प ते मोतसावंगा जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याची तात्पुरती योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेना राज्य शासनाने १५ मार्च रोजीच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. तथापि, या योजनेचे काम करण्यापूर्वी प्रशासनाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा धरण आटल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पालिकेने सोनल प्रकल्पातील मृतसाठ्याचा वापर करण्याच्या उद्देशाने सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलपर्यंत जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा करण्याची योजना आखली आहे.
संबंधित वरिष्ठस्तरावर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्तांमार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर अशा योजनांसदर्भात मुख्य सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात स्थापन करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत १४ मार्च रोजी हा प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरीसाठी विचारात घेण्यात आला. या समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर समितीने एकूण ४,०४,४६३२८ एवढ्या किमतीच्या प्रस्तावास मंजूरी दिली. यातील ९५ टक्के रक्कम अनुदान म्हणून शासनाकडून मिळणार असून, उर्वरित ५ टक्के रक्कम पालिकेला खर्च करावी लागणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी वाशिम यांनी मंगरुळपीर शहरात पाणीटंचाई घोषीत केल्यानंतर या योजनेच्या पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. या योजनेचे व्यवस्थापन आणि सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरण काम पाहणार आहे. या योजनेची कामे विहित पद्धतीने निविदा मागवून करावी लागणार आहेत.
सोनल प्रकल्पातील साठ्याची मोजणी आवश्यक
ज्या सोनल प्रकल्पाच्या आधारे मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना मंगरुळपीर पालिकेने प्रस्तावित केली आहे. त्या सोनल प्रकल्पात केवळ मृतसाठा उरला असल्याने या योजनेच्या निविदांना अंतिम मंजुरी देण्यापूर्वी सोनल प्रकल्पातील प्रत्यक्ष जलसाठ्याची मोजणी करावी लागणार असून, आवश्यक जलसाठा असल्याची खात्री झाल्यानंतरच महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अकोलाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडून निविदा अंतिम करण्यात येणार आहेत. या निविदा प्रक्रिया १० एप्रिलपर्यंत पूर्ण करून १५ मेपर्यंत योजनेचे काम पूर्ण करावे लागणार आहे.