स्वतंत्र सचिवाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आक्रमक
By admin | Published: May 27, 2017 07:43 PM2017-05-27T19:43:23+5:302017-05-27T19:43:23+5:30
२५ मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना निवेदन दिले.
रिसोड: तालुक्यातील नंधाना येथील ग्रामसचिव विनोद विर यांची तात्काळ बदली करुन नंधाना ग्रामपंचायतीला स्वतंत्र सचिव देण्याची मागणी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी २५ मे रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याची दखल न घेतल्यास १ जुन २०१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करुन कामकाज बंद करण्याचा इशाराही दिला आहे.
रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नंधाना या गावासाठी कार्यरत ग्रामसेवक गावात नियमित येत नाहीत. सर्वसामान्य माणसाला दाखल्यावर सही आणण्यासाठी रिसोड येथेच जावे लागते. अनेक कामासाठी सचिवाची सही घेण्यासाठी रिसोडलाच जावे लागते. ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी अनेक वेळा सचिवांना गावात प्रत्येक आठवड्यात एक दिवस येण्याची विनंती केली. परंतु त्याचा फायदा झाला नाही. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, दरम्यान, ग्रामससचिव असूनही, जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचासह सर्व सदस्यांमध्ये रोेषाचे वातावरण असून, या संदर्भात संबंधितांना माहिती देऊनही काहीच फायदा होत नसल्याने त्यांनी रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून आपल्या समस्या त्यामध्ये मांडल्या आहेत. त्या समस्यांचा विचार करून नंधाना येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांची बदली करण्यासह येथे स्वतंत्र ग्रामसेवक देण्याची मागणी त्या निवेदनातून करण्यात आल आहे. याची दखल घेतली नाही, तर येत्या १ जून रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रति ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत. निवेदन देतवेळी सरपंच सुधाकर बोरकर, उपसरपंच गजानन पवार, ग्रा.पं. सदस्य गजानन बोरकर, काशीराम उबाळे, सविता बोरकर, सरलाबाई चव्हाण, संगिता बोरकर, रंजना उबाळे, रेखा उबाळे यांच्यासह गावातील पुरुष आदि उपस्थिती होते.