कृषी विभागाच्या बदली प्रक्रियेमुळे अनुदान रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:04+5:302021-09-18T04:44:04+5:30
इझोरी येथे दोन वर्षांपूर्वी रोहयोंतर्गत चाळीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे. त्यांना योजनेंतर्गत सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे देयकही ...
इझोरी येथे दोन वर्षांपूर्वी रोहयोंतर्गत चाळीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे. त्यांना योजनेंतर्गत सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील अनुदानाचे देयकही मिळाले. या अनुदानाच्या बळावरच त्यांनी फळबाग लागवड केली. या फळबाग लागवडीनंतर शेतकऱ्यांना योजनेच्या निकषानुसार दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळणे क्रमप्राप्त आहे. तशी मागणीही त्यांनी कृषी विभागाकडे केली; परंतु गत दोन ते तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कृषी विभागाच्या बदली प्रक्रियेंतर्गत इंझोरी येथील कृषी सहायकांची इतर ठिकाणी बदली झाली. नवे कृषी सहायकही इंझोरी येथे रुजू झाले. त्यामुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळण्याची आशा वाटू लागली; परंतु नव्या कृषी सहायकांनी फळबाग लागवडीच्या अनुदानासाठी प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यामुळे इंझोरी येथे फळबाग लागवड करणारे ४० शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
०००००००००००००
उसणवारीवर केले फळबाग लागवडीचे काम
रोहयो अंतर्गत कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेत निवड झाल्यानंतर इंझाेरीतील ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी फळबाग लागवडीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले. त्यानंतर त्यांना उसणवारी करून फळबाग लागवडीच्या इतर कामासाठी खर्च करावा लागला. आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदान रखडल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
००००००००००००००००
कोट: रोहयोंतर्गत कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेत निवड झाल्यानंतर आम्हाला पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर फळबाग लागवड केली; परंतु कृषी सहायकांच्या बदलीनंतर नव्या कृषी सहायकांनी अनुदानाची देयकेच सादर केली नाहीत. त्यामुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
- अजय ढोक,
शेतकरी, इंझाेरी.
००००००००००००००००००
कोट: रोहयोतील फळबाग लागवड योजनेत निवड झाल्याने फळझाडांची लागवड केली. पहिल्या टप्प्यातील अनुदानही मिळाले. आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा असताना अद्याप कृषी सहायकांनी अनुदानाची देयकेच सादर केली नसल्याने आम्ही अडचणीत सापडलो आहोत.
- गणेश काळेकर,
शेतकरी इंझोरी.