----------
कारंजात आणखी तिघे बाधित
कारंजा : तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून, शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार कारंजा शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील १, सागर निवास परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. या तिघांवर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत.
-------
पोहरादेवीत बालिकांचे स्वागत
पोहरादेवी : महिला व बालविकास विभागाकडून २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. याअंतर्गत पोहरादेवीसह परिसरातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांच्या पुढाकारातून बालिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओंतर्गत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
-------------
आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याचे आवाहन !
मानोरा : कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी लस घेतलेल्या काही जणांना काही तासांनंतर सौम्य ताप, अंगदुखी, मळमळणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसून, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी डॉक्टर व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी अवश्य लस घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी केले.
---------------
अडाण प्रकल्पाची पातळी ८० टक्क्यांवर
इंझोरी : गतवर्षीच्या दमदार पावसामुळे अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला होता. सततच्या पावसामुळे हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याचा विसर्गही करावा लागला होता; परंतु आता सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने प्रकल्पाची पातळी खालावली असून, या प्रकल्पात आता ८० टक्के साठा उरला आहे.
-----------------
समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत मार्गदर्शन
घनज बु. : पाणी फाउंडेशनकडून राबविण्यात येत असलेल्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा तालुक्यात सहभागी गावांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात आहे. याअंतर्गत शनिवारी तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी धनज बु. परिसरातील ग्रामस्थांना जल व मृद संधारणाच्या कामांबाबत मार्गदर्शन केले.