वाशिम : जिल्ह्यातील मोतसावंगा (ता.मंगरूळपीर) येथे २०१९ मध्ये अतिवृष्टी व गारपीट होऊन शेकडो एकरातील पिकांची अतोनात हानी झाली; मात्र दोन वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे अखेर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी सामूहिकरीत्या मंगरूळपीरचे तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना याबाबत खड्या आवाजात जाब विचारला.
यासंदर्भातील निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, २०१९-२० च्या हंगामात गहू, हरभरा, बिजवाई कांदा पिकाची शेतात पेरणी केली. पीक ऐन काढणीला आले असतानाच अतिवृष्टी व गारपीट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी सहायक, तलाठ्यांनी तीन ते चार दिवस मोतसावंगा येथे थांबून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले; मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्यात आली नाही. तथापि, येत्या ७ दिवसांत भरपाई न मिळाल्यास २१ सप्टेंबर रोजी लघु पाटबंधारे विभागाच्या मोतसावंगा प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेऊ, असा इशाराही संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.