वाशिम : देपूळ येथे आरोग्य पथक दाखल; त्वचाविकार ग्रस्तांवर केले उपचार, श्र्वानांचेही लसीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:52 PM2018-01-22T19:52:55+5:302018-01-22T20:02:01+5:30
‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांवर उपचार व श्वानांचे लसीकरण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ (वाशिम): गावातील पाळीव आणि मोकाट अशा अनेक श्वानांना गेल्या अज्ञात त्वचाविकाराची लागण होऊन त्यांच्या अंगाला मोठमोठ्या जखमा झाल्या. हा संसर्ग काही गावक-यांनाही जडून ३० ते ४० नागरिकांच्या अंगाला खाज सुटली. यासंबंधी ‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांवर उपचार व श्वानांचे लसीकरण केले.
देपूळ येथे वावरणा-या श्वानांच्या अंगावरील केस जावून त्याठिकाणी मोठमोठ्या जखमा झाल्या असून त्यातून रक्तस्त्राव देखील होत आहे. त्यामुळे ही कुत्री पिसाळण्याची शक्यता वर्तविली जात होती. दुसरीकडे गावातील काही नागरिकांच्या अंगालाही वेगळ्याच प्रकारची खाज सुटली असून श्वानांच्या संसर्गामुळेच हा आजार जडल्याची भिती गावात वर्तविली जात होती. दरम्यान, याप्रकरणी ‘लोकमत’ने सर्वंकष वृत्त प्रकाशित करताच पार्डी टकमोर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणा-या कळंबा महाली आरोग्य उपकेंद्राची चमू आणि पशुवैद्यकीय दवाखाना, वाराच्या पथकाने गावात येऊन त्वचाविकाराने त्रस्त ३० नागरिकांवर उपचार केला. तसेच पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.के.वानखेडे यांनी १० ते १५ श्वानांचे लसीकरण केले. आरोग्य विभागाच्या पथकामध्ये आरोग्य सेवक आर.व्ही.वाघ, एन.डी.बिटोडे, आशा लंका गंगावणे, वर्षा जोंधळे आदिंचा समावेश होता.