वाशिम: शासनाने जिल्ह्यात जुन ते जुलैदरम्यान अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानापोटी ५ हजार शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे. तथापि, याच कालावधित घरांची, गोठ्यांची पडझड, तसेच दगावलेल्या गुरांच्या नुकसानापोटी बाधित कुटूंबे, पशूपालकांना मदतीची प्रतिक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने बाधितांना मदत देण्यासाठी १ कोटी ५ लाख ४४ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
जिल्ह्यात यंदा जुलैच्या सुरुवातीपासून पावसाचा कहर सुरु आहे. वारंवारच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीपिकांसह विविध प्रकारची हानी झाली. त्यात एका घराची पूर्णत: आणि ५५४ घरांची अंशत: पडझड झाली, तसेच १५ गोठेही पडले असून, पाण्यात वाहून, गोठा पडल्याने, वीज पडल्याने १३९ लहान, मोठी गुरेही दगावली. या नुकसानापाेटी जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्यांच्या आधारे अहवाल तयार करून तो विभागीयस्तरावर पाठवत निधीची मागणी केली आहे. २१ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सुधारीत अहवालही पाठवला, परंतु शासनाकडून बाधित कुटुंब, मृतांच्या वारसांना अद्याप मदत मिळाली नाही.कशासाठी किती हवी मदत
१) दगावलेली, जखमी गुरे - १३९आवश्यक मदतनिधी - २०,५२००पूर्णत: पडलेली घरे - ०१आवश्यक मदतनिधी - १,५०,०००अंशत: पडलेली घरे - ५५४आवश्यक मदतनिधी - ८३,१०,०००पडलेले गुरांचे गोठे - १५आवश्यक मदत - ३१,५००मृतकांच्या वारसांनाही प्रतिक्षा
जिल्ह्यात जुन ते ऑगस्टदरम्यान विविध वीज पडून २ जणांचा आणि इतर नैसर्गिक आपत्तीने ६ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जणांना दुखापत झाली. या नुकसानापोटी मृतकांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख, तर जखमींना प्रत्येकी १२,७०० रुपये प्रमाणे ३२,४६,९०० रुपये मदतनिधीची गरज असताना २९ लाखांचे वितरण करण्यात आले, तर ३ लाख ४६,९०० रुपये निधी प्रलंबित आहे.ऑगस्टमधील पीक नुकसानाची मदतही प्रलंबित
यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पीक नुकसानापोटी शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी रक्कम मंजूर केली. त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ जुन, जुलैमधील नुकसानाची मदत मिळाली असून, ऑगस्टमधील नुकसानाची मदत प्रलंबित असल्याने ती मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानापोटी सुधारीत अहवाल पाठवून शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच बाधितांचा खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम