वाशिम दि. २१- विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी अनुदानासंदर्भात १९ सप्टेंबर रोजी शिक्षण विभागाने काढलेला शासन निर्णय (जीआर) जाचक आहे. या जीआरमधील जाचक अटी व शर्थींमुळे अनुदान मिळणार नसल्याचे सांगून या जीआरची होळी २१ सप्टेंबर रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी केली. राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनाने अनुदान देण्यासंदर्भात जो शासन निर्णय (जीआर) काढला, त्यात यापुढे बहुतांश शाळेला अनुदान मिळणार नाही, अशी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची धारणा झाली आहे. या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करुन नव्याने जीआर काढावा, शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा अनुदान द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. १ व २ जुलै सहीत प्राथमिक व माध्यमिक शाळांचा अनुदानाचा शासन निर्णय काढावा, १९ सप्टेंबर २0१६ चा जीआर रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांना देण्यात आले. यावेळी विमाशी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, शिक्षक आघाडी व इतर संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यावेळी काही शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा काळा जीआर रद्द न केल्यास २ ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
शिक्षकांनी केली शासन निर्णयाची होळी!
By admin | Published: September 22, 2016 1:21 AM