लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे ५० वर्षावरील होमगार्डला ड्यूटी, बंदोबस्तावर घेतले जात नसल्याने त्यांच्यासह कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. बंदोबस्तावर घेण्याची मागणी होमगार्डस् यांनी निवेदनाद्वारे ८ एप्रिल रोजी केली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. पोलिसांच्या दिमतीला होगगार्डदेखील घेतले जातात. ५० वर्षांवरील नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे सांगून होमगार्डला बंदोबस्त दिला जात नाही. शासनाच्या जाचक परिपत्रकामुळे ५० वर्षावरील होमगार्डला बंदोबस्तापासून वंचित राहावे लागत आहे, ५० वर्षावरील सर्व पुरुष व महिला होमगार्ड सैनिक हे गेल्या दीड वर्षापासून कोविड-१९ बंदोबस्त पासून वंचित ठेवल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या भयंकर संकटात हाताला काम नाही व शासनाच्या जाचक अटीमुळे बंदोबस्त नाही. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळी शासनाने मैदानी चाचणी घेतली. त्यामध्ये पुरुष व महिला होमगार्ड सैनिक पात्र झाले असून सुद्धा व कोविड-१९ लसीचा पहिला व दुसरा डोज घेऊन सुद्धा बंदोबस्त पासून वंचित ठेवले आहे, असे निवेदनात नमूद आहे. जाचक अट रद्द करून होमगार्ड सैनिकांना बंदोबस्त देण्याची मागणी होमगार्ड सैनिकांनी केली. निवेदनावर तानाजी गंगावणे, सुभाष पवार, गोविंदराव वानखेडे, मोहन कोकाटे, विनोद लव्हाळे, मोतीराम इंगळे, राजूसिंग चव्हाण, गजानन वानखेडे, भारत खडसे, नरेंद्र बगळे, प्रकाश शेळके, गजानन भोपळे, रमेश जाधव, पुष्पलता डी.सावंत आदींच्या स्वाक्षरी आहेत.
कोरोनामुळे ५० वर्षावरील होमगार्डला मिळेना ड्यूटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:54 AM