राज्यातील ८१ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 06:20 PM2020-02-18T18:20:37+5:302020-02-18T18:20:52+5:30
अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या ४१ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या ४० अशा एकूण ८१ विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने लवकरच सन्मानित केले जाणार आहे. या योजनेत अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार राज्यातून व विभागातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाºया इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान केला जातो. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. सन २०१८-१९ या वर्षात इतर मागास प्रवर्गातील ४१ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ४० असे एकूण ८१ विद्यार्थी या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या मान्यतेअभावी गुणवंत पुरस्कार प्रदान करण्याची प्रक्रिया रखडली होती. शेवटी १७ फेब्रुवारी रोजी या प्रक्रियेस शासनाची मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाही सुलभ झाली आहे. राज्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी एक लाख रुपये तर विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी ५१ हजार रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे. इतर मागास प्रवर्ग या गटात अमरावती विभागातील विद्यार्थीनी व विद्यार्थी राज्यात प्रथम आल्याने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा पुरस्कार तर उर्वरीत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून अमरावती विभागातील दहावीतील दोन व बारावीतील दोन अशा चार विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.पुरस्कार वितरणाची तारीख अद्याप निश्चित झाली नसून, लवकरच तारीख निश्चित होण्याचा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कार योजनेत वाशिम जिल्ह्यातील एकही विद्यार्थी नाही, याची थोडीफार खंत आहे. मात्र, अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, याचे समाधानही आहे.
- तानाजी नरळे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम