हॉटेल्स्, दारू दुकानांची झाडाझडती; एक दुकान सील !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:37 AM2021-04-26T04:37:38+5:302021-04-26T04:37:38+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदीची सुधारित नियमावली लागू केली असून, त्याची अंमलबजावणी देखील जिल्ह्यात सुरू झालेली आहे. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दवाखाने वगळता वगळता उर्वरित सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा व अन्य वस्तू, साहित्य घेण्यासाठी नागरिकांची एकच धामधूम सुरू राहते. याशिवाय रात्रीच्या वेळी जिल्ह्यातील महामार्गालगत असलेल्या काही ढाबे, हॉटेल्समध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २५ एप्रिलच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यासंदर्भात दारू दुकाने, हॉटेल्सची झाडाझडती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान झाडाझडती घेतली असता, वाशिम शहरातील पाटणी चौक स्थित मराठा वाईन शॉप येथून दारू विक्री होत असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी संबंधितांना समज दिली असून, सर्वांनी नियमाचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला.