भारनियमन रद्द न केल्यास दूर्गास्थापनाच करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 02:54 PM2018-10-10T14:54:16+5:302018-10-10T14:55:30+5:30
शिरपूर जैन (वाशिम): महावितरणने वीज चोरी रोखण्याच्या नावाखाली शिरपूर जैन येथे ऐन दूर्गोत्सवातच ९.१५ तासांचे भारनियमन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): महावितरणने वीज चोरी रोखण्याच्या नावाखाली शिरपूर जैन येथे ऐन दूर्गोत्सवातच ९.१५ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. यामुळे उत्सव साजरा करण्यात अडचणी येणार असल्याने दूर्गोत्सव मंडळांत संतापाची लाट पसरली असून, हे भारनियमन रद्द न केल्यास दूर्गा स्थापनाच न करण्याचा इशारा त्यांनी १० आॅक्टोबर रोजीच महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे सांगत महावितरणने ९ आॅक्टोबरपासून म्हणजेच दूर्गाेत्सवाच्या पूर्वसंध्येपासून दिवसाच्या काळात तीन टप्प्यांत मिळून ९.१५ तास भारनियमन सुरू केले आहे. यामुळे विविध व्यवसायांवर परिणाम होऊन त्याचा फटका जनतेला बसणार आहेच शिवाय दूर्गोत्सव साजरा करण्यात अडचणी येणार आहेत. विशेषत: सकाळी ५ ते ८ आणि रात्री ६.३० ते ९.३० या काळात होणारे भारनियमन या उत्सवात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. यामुळे अंधारात अनुचीत घटना घडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे दूर्गोत्सव काळात हे भारनियमन रद्द करावे, अन्यथा शिरपूर येथील एकही दूर्गोत्सव मंडळ दूर्गादेवीची स्थापनाच करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना १० आॅक्टोबर रोजी दूर्गास्थापनेच्या दिवशीच निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.