अकोला जिल्ह्यात असलेली पांगरी येथील शाळा वाशिम जिल्ह्यात समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:28+5:302021-02-06T05:17:28+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे गाव पूर्वी बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये सामील होते, तांत्रिकदृष्ट्या अकोला जिल्ह्यात असलेले हे गाव मोठ्या ...
मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे गाव पूर्वी बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये सामील होते, तांत्रिकदृष्ट्या अकोला जिल्ह्यात असलेले हे गाव मोठ्या प्रयत्नानंतर वाशिम जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले . महसुली गाव म्हणून दर्जा मिळाला असला तरीही या गावाचा वनवास मात्र अजूनही संपलेला नाही. या गावाला ग्रामपंचायत नसून तात्पुरती व्यवस्था म्हणून लगतच्या ग्रामपंचायत कार्यालयातून या गावाला आवश्यक शासकीय सेवा दिल्या जातात. या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. सोबतच या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत समाविष्ट आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक कामे करताना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून, वाशिम जिल्ह्यात गाव असूनही शैक्षणिक सुविधा पुरविण्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेला अडचणी येतात. तसेच अन्य अडचणींमुळे पालक व विद्यार्थीसुद्धा अडचणीत आले आहेत. महसुली गाव वाशिम जिल्ह्यात असताना जिल्हा परिषद शाळा मात्र अकोला जिल्ह्यात असल्याने याबाबत जिल्हा परिषद सदस्या सुनीता कोठाळे यांनी पालकांची व्यथा मांडण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात पांगरी येथील शाळा अकोला जिल्ह्यात समाविष्ट असल्याने येत असलेल्या अडचणींवर चर्चा करून ही शाळा वाशिम जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी संबंधिताना आदेशित करण्याची विनंती करण्यात आली आहे. शाळेच्या कामासाठी अडचणीची पालकांना अकोला किंवा बार्शीटाकळी येथे जावे लागते तसेच भौतिकदृष्ट्या अकोला येथे जाणे येथील पालकांना अडचणीचे आहे. या गावातील मतदार हे वाशिम जिल्ह्यात सामील असून, अकोला जिल्ह्यातील पुढाऱ्यांना येथील मतदारांनाही काही काम पडत नाही, त्यामुळे साहजिकच तेथील लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुसऱ्या जिल्ह्यातील गावात असलेल्या शाळेवर फारसे लक्ष देणे शक्य नाही त्यामुळे ही शाळा अकोला जिल्ह्यात असूनही शाळेचा कोणी वाली नसल्याने येथील विद्यार्थी व पालकांची मोठी पंचाईत झाली आहे, नव्हे तर त्यांना हक्काच्या शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने पालकांनी ही व्यथा जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनीता पांडुरंग कोठाळे यांच्याकडे मांडली. पालकांची होत असलेली अडचण पाहता जिल्हा परिषद सदस्य सुनीता कोठाळे यांनी याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना भेटून निवेदन सादर केले असून, ही अडचण सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करून पांगरी येथील जिल्हा परिषद शाळा अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात समाविष्ट करून घेईपर्यंत पुरेपूर प्रयत्न करण्याची हमी त्यांनी पांगरी येथील पालकांना दिली आहे.