वाशिम : तालुक्यातील काटा ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये वीरेंद्र देशमुख यांच्या पॅनलच्या उमेदवाराचा विजय झाल्याने सत्ताधारी गटाच्या हातून ही ग्रामपंचायत गेली.
काटा ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्यांचे संख्याबळ आहे. ११ सदस्यांपैकी शिवसेनेच्या पॅनलमधून पाच उमेदवार विजयी झाले. यामध्ये किशोर झणकराव देशमुख, संजय मलकार्जुन कोतिवार, शिवकन्या संतोष चोपडे, निर्मला दिगंबर करंगे व शारदा संजय कांबळे हे विजयी झाले. स्व. विनायकराव अण्णा देशमुख यांच्या पॅनलमधील पाच उमेदवार विजयी झाले. यामध्ये पांडुरंग दिनकरराव देशमुख, लीला नारायण साळसुंदर, वैशाली शंकर देशमुख, अय्युबखाँ बशीरखाँ पठाण, जया रामकिसन मोरे यांचा विजय झाला.
शिवसेनेच्या रुख्मीना मोहन मुखमाले व काँग्रेसच्या अनिता चक्रधर कंकणे या दोन उमेदवारांना ३४६ अशी समसमान मते मिळाली होती. दोन्हीही पॅनलला सत्ता स्थापनेसाठी एका उमेदवाराची आवश्यकता होती. या उमेदवाराची ईश्वर चिठ्ठी काढणे म्हणजे केवळ उमेदवारच विजयी होणे एवढेच नव्हते तर ईश्वर चिठ्ठी ही सत्ता स्थापन करणारा ‘पासवर्ड’च होता. दोन्ही उमेदवार व पॅनल प्रमुख यांच्यासमक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अभिजित गव्हाणे याच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढली. या ईश्वर चिठ्ठीत काँग्रेसच्या अनिता चक्रधर कंकणे यांचे नाव निघाल्याने काँग्रेसच्या तंबूत एकच जल्लोष झाला. या ईश्वर चिठ्ठीमुळे काँग्रेसचे संख्याबळ पाचहून सहा एवढे झाल्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला.
काटा येथील ग्रामपंचायत निवडणूक ही खरोखरच ‘काट्याची लढत’ झाल्याची चर्चा जिल्हाभरात रंगली. एकूणच या ईश्वर चिठ्ठीने स्व. विनायकराव अण्णा देशमुख यांच्या पॅनलला कौल मिळाल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी पुरेसे झाले.