वाशिम: जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींमधील ४८६ प्रभागांतील १,२३३ जागांसाठी १५ जानेवारीला करण्यात आले. या जागांसाठी ३,२२६ उमेदवार रिंगणात हाेते. या उमेदवारांना मतदान करण्यासाठी वृद्ध व तरुण मतदारांचा मतदानासाठी पुढाकार दिसून आला. ७५ ते ९० वर्षीय वृद्धांचा मतदान करताना समावेश दिसून आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष दक्षता घेण्यासंदर्भात प्रशासनाने सूचित केले हाेते, परंतु अनेक केंद्रांवर काेराेना संसर्ग पाहता, खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. वाशिम तालुक्यातील अनेक मतदान केंद्रासह मालेगाव तालुक्यातील करंजी, मुंगळा तर रिसाेड तालुक्यातील लोणी येथे वृद्ध महिलांनी माेठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. लाेणी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान करण्यासाठी काही युवकांनी वृद्धांना काखेत घेऊन मतदान करून घेतले, तसेच यावेळी युवकांचाही माेठ्या प्रमाणात समावेश दिसून आला.
तसेच जिल्ह्यात ५० संवेदनशील आणि ११ अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार, वादविवाद होऊ नये, म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता, याशिवाय फिरते पथकही भेटी देऊन पाहणी करताना दिसून आले. अनेक वृद्ध कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पाेहोचविण्यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी मतदान वेळेत अनेक केंद्राना भेटी देऊन पाहणी केल्याचे दिसून आले.