भामदेवी शिवारातील पांदण रस्त्याची महसूल विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:28+5:302021-05-21T04:43:28+5:30
भामदेवी शेतशिवारात असलेल्या शेतांकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत; परंतु मोठा नाला आडवा गेल्याने अधिक पाऊस झाल्यास त्याला पूर येऊन ...
भामदेवी शेतशिवारात असलेल्या शेतांकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत; परंतु मोठा नाला आडवा गेल्याने अधिक पाऊस झाल्यास त्याला पूर येऊन सर्वच मार्ग बंद होतात. नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्यास तेथून ट्रॅक्टरसुद्धा शेतात नेता येणे अशक्य होते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी साहित्य तथा मजुरांना शेतात घेऊन जाता येत नाही. तसेच पिकलेले पीक कापून घरीदेखील आणता येत नाही. या दुहेरी संकटामुळे ७० एकरपेक्षा अधिक शेतजमीन दरवर्षी पडीकच ठेवावी लागत आहे.
याबाबत ‘लोकमत’ने २० मे च्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत मंडळ अधिकारी शिवानंद कानडे, पटवारी नीलेश कांबळे, ग्रामसेवक उपाध्ये, कृषी सहायक मार्गे, कोतवाल सिद्धार्थ जाधव, अतुल मुंदे आदींनी या रस्त्याची पाहणी केली. नकाशानुसार चार किलोमीटर अंतराचा रस्ता व दोन बंधाऱ्यांसह मोठा पूल उभारण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. विविध योजनांमधून ही कामे करावी लागणार असून भामदेवी शिवारातील शेतकऱ्यांसोबत २१ मे रोजी तहसीलदारांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या समस्येला यामुळे वाचा फुटल्याचे बोलले जात आहे.