राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची धांदलघाई; वाहतूक खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:28 PM2019-11-18T15:28:04+5:302019-11-18T15:28:59+5:30
वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मुदत जवळ येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी कामाला वेग दिला आहे. यामुळे महामार्गावर एकाचवेळी २ ते ३ मशीनचा वापर होत असून या मार्गावर सुरू असलेल्या वाहतूकीला त्याचा फटका बसत आहे. रविवारी मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांपूर्वीपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील वाशिम ते कारंजा, मालेगाव ते रिसोड, शेलुबाजार ते मानोरा आणि कारंजा ते मानोरा, अशी राष्ट्रीय महामार्गाची कामे करण्यात येत आहेत. ही कामे कार्यारंभ आदेशानंतर २ वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. निविदा प्रक्रियेतच तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यात पावसाळ्यात वारंवार या कामांत खोळंबा निर्माण झाला, तर त्यानंतर सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस, तसेच आॅक्टोबरच्या अखेरनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाचा जोर राहिल्याने या कामांत पुन्हा खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे कामे रखडली. आता या कामांसाठी खुप कमी कालावधी उरला असल्याने ही कामे पूर्ण करण्याची घाई संबंधित कंत्राटदार कंपन्या करीत आहेत. यासाठी अधिकाधिक मनुष्यबळ आणि मशीनचा वापर करून तातडीने खोदकाम आणि समतलीकरणाचे कामकंत्राटदारांकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे एका बाजुने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एकाचवेळी दोन्ही प्रकारची कामे सुरू असल्याने या मार्गांवर वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे. ठिकठिकाणी जेसीबी, पोकलन मशीन गौणखनिज पसरविण्याचे काम करण्यात येत असल्याने या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांसह, मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, खासबी प्रवासी वाहने रस्त्यावर उभी राहत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या सर्वच कामांवर हा प्रकार पाहायला मिळत असून, रविवार १७ नोव्हेंबर रोजी वाशिम-मंगरुळपीर दरम्यान या प्रकाराचा अतोनात त्रास प्रवासी आणि वाहनधारकांनाही सहन करावा लागला. आता आणखी चार ते पाच महिने तरी हा त्रास कायम राहणार असल्याचे दिसत आहे.