वाशिम जिल्ह्यात सर्वत्र लम्पीचा शिरकाव; मालेगावातील शिरपुरातही जनावराला बाधा
By दादाराव गायकवाड | Published: September 16, 2022 03:41 PM2022-09-16T15:41:32+5:302022-09-16T15:42:13+5:30
जिल्ह्यात दिवसेंदिवस या आजाराचा प्रकोप वाढताच असल्याने पशूपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वाशिम: जिल्ह्यातील पाच तालुक्यात यापूर्वीच लम्पी पसरत असताना आता राहिलेल्या मालेगाव तालुक्यातही या आजाराने शिरकाव केला आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील शाम यादवराव ढवळे यांच्या बैलास लम्पी आजाराची लागण झाल्याची माहिती १६ सप्टेंबरला मिळाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस या आजाराचा प्रकोप वाढताच असल्याने पशूपालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील वाकद, खडकी (सदार), वाशिम तालुक्यातील कामठवाडा मानोरा तालुक्यातील फुलउमरी, मंगरुळपीर तालुक्यातील नागी येथील जनावराला लम्पीची बाधा झाली असताना आता मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथेही लम्पीने शिरकाव केला आहे. शिरपूर जैन येथील शाम यादवराव ढवळे यांच्या बैलास लम्पी आजाराची लागण झाल्याची माहिती व बाधित बैलाचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर टाकत परिसरातील पशूपालक बांधवांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
लम्पीबाबतच्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
जनावरावरील लम्पी रोगाबाबत समाज माध्यमातून गैरसमज पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि पशूपालकांनी यावर विश्वास ठेवू नये. लम्पी झालेल्या जनावरांचे दूध हानीकारक नाही. ते पिण्यास योग्य आहे. माणसाला जनावरांपासून लम्पी आजाराचा संसर्ग होत नाही. तसेच कोंबड्या व बकऱ्यांवर लम्पीचा संसर्ग होत नाही, असेही आवाहन जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. वानखेडे यांनी केले आहे.