लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बोराळा येथील अडोळ सिंचन प्रकल्पात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक असून आसेगाव पो.स्टे . धरणात उणापूरा १० टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे.बोराळा धरणात मृत जलसाठाबोराळा येथील अडोळ लघू प्रकल्पामध्ये सद्या मृत जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. मागील तीन वर्षापासून हे धरण १०० टक्के कधीच भरलेले नाही. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अडोळ लघूप्रकल्प ५५ टक्के भरले होते, याच धरणाच्या क्षेत्रामध्ये हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. रिसोड, शिरपूर, रिठद या मोठ्या गावांनाही त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन वर्षापासून धरण न भरल्यामुळे परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नसल्याने पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट येत आहे. पाणी उपलब्ध झाल्यास भुईमुंग, हळद, हरभरा आदी पिके घेणे शक्य होतील; परंतू यंदाही गतवर्षीपेक्षाही गंभीर परिस्थिती असून पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे धरणात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास जनावरांसोबतच नागरिकांनाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आसेगाव बांध धरणात १० टक्के जलसाठा आसेगाव पो. स्टे. येथील बांध धरण गतवर्षी १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊनही मोठा पाऊस अद्याप न झाल्यामुळे धरणात केवळ १० टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिसरातील लहान स्वरूपातील धरण तसेच पाझर तलावांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. यावर्षी विहिरींचीही पाणीपातळी तसूभर देखील वाढलेली नाही. यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.