वाशिम : काेराेनाने जगभरात लाखाे लाेकांना वेठीस धरले. पण, काेराेनाने सर्वांना अनेक गाेष्टीसुद्धा शिकविल्या. सर्वांची जगण्याची पद्धतच काेराेनाने बदलून टाकली आहे. लाेकांच्या विचारसरणीतदेखील या संकटाने बराच फरक पडला आहे. लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीनिमित्त काय स्थिती हाेती आणि त्यात काय बदल झाला, याचा घेतलेला आढावा.
काेराेनाची वाढती संख्या पाहता २३ मार्च २०२० मध्ये सुरू झालेल्या लाॅकडाऊनने एक ना अनेक अशा चांगल्या, वाईट गाेष्टींचा अनुभव आला. लाॅकडाऊनमध्ये बंद झालेले उद्योग, व्यवसायावर परिणाम, सर्वत्र शुकशुकाट आजच्या घडीला वर्क फ्राॅम हाेम, ऑनलाइन शिक्षणासह बदलल्या स्वरूपात सुरू झाले आहे.
जगभरात हाहाकार माजविणाऱ्या काेराेना महामारीने सर्वत्र प्रवेश केला. आणि त्यानंतर लाॅकडाऊनला नागरिकांना सामाेरे जावे लागले. जिल्ह्यातही ३ एप्रिलला पहिला बाधित आढळून काेराेनाने प्रवेश केल्यानंतर जिल्हावासीयांत चिंतेचे वातावरण पसरले हाेते. आजपर्यंत कधीही पाहिला नसेल असा बंद म्हणा की संचारबंदी, कर्फ्यु या लाॅकडाऊनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला.. काहींवर क्षणिक तर काहींवर दूरगामी. परंतु सगळ्यातून सावरत काेराेनाशी दाेन हात करीत वाशिमकरांनी पुढे पाऊल टाकणे सुरू केले आहे. ‘मिशन बीगिन अगेन’ने जनजवीन सुरळीत झाले. परंतु, काेरोनाच्या संकटाने पुन्हा डाेके वर काढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
................
असे झाले बदल
१. ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पना पुढे आली : लाॅकडाऊनमुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ ही नवी संकल्पना पुढे आली. अनेक उद्योग - व्यवसाय, कार्यालयीन काम घरून सुरू ठेवण्यात आले. अनेक उद्योग - व्यवसायही याच पद्धतीने सुरू आहेत.
२. सामाजिक संघटना सरसावल्यात : लाॅकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक संकटाला सामाेरे जावे लागले. माेलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने अनेक संघटना, सामाजिक संस्था पुढे येऊन त्यांनी मदतीचा हात दिला.
३. कुटुंबाशी संवाद वाढला : सर्वत्र लाॅकडाऊनमुळे राज्यात, परजिल्ह्यात नाेकरीवर असलेल्यांनी घर गाठले; त्यामुळे कुटुंबाशी संवाद वाढला.
४. ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली : लाॅकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. हळूहळू त्या ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या. शिक्षणाचे धडे ऑनलाइन देण्यास सुरुवात झाली.
४. ऑनलाइन व्यवहारांना चालना : लाॅकडाऊन काळात अनेक जण घराबाहेर निघण्यास धजावत नसल्याने भाजीपाल्यासह घरगुती साहित्य घरपाेच देण्याचा ऑनलाइन उपक्रम राबविण्यात आला. विविध ॲप्सद्वारे या व्यवहारांना चालना मिळाली.
४. पार्सल सुविधेला चालना : लाॅकडाऊनपूर्वीही असलेल्या पार्सल सुविधेला या काळात चांगलीच चालना मिळाली. काेराना संसर्ग वाढू नये याकरिता प्रशासनाने पार्सल सुविधेवर भर दिल्यानंतर या सुविधेला गती आली. यासह अनेक बदल तर दिसून आलेच; शिवाय जीवनशैलीतही माेठा बदल झाला.
५. जीवनशैलीत बदल : काेराेना संसर्ग पाहता घराबाहेर निघताना मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर जास्तीतजास्त करणे तसेच कामानिमित्त घराबाहेर पडून काम आटाेपल्यावर ताबडताेब घरी येणे, मर्यादित वेळेत काम आटाेपणे, राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व्यायामावर भर देणे आदी बदल जीवनशैलीत झाले आहेत.