खापरदरी या गावात २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेला व्यायामशाळेसाठी निधी मिळूनही संस्थाचालक वसंत चव्हाण यांनी व्यायामशाळेचे बांधकाम केले नाही, अशी तक्रार २०१४ मध्ये जानकीराम राठोड यांनी केली होती. अजूनही व्यायामशाळेसाठी गावातील युवकांचा लढा चालूच आहे. कित्येक वेळा क्रीडा अधिकारी येऊन चौकशी करून, नोटीस देऊन गेले. तरी पुढील कोणतीही कारवाई झाली नाही. या बाबतीत प्रशासन तातडीने निर्णय का घेत नाही, अशी ओरड सगळीकडे सुरू आहे. प्रत्यक्षात व्यायामशाळा अस्तित्वात नाही. असे असताना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत कडक कारवाई का करू नये, असा प्रश्न विचारणारे तक्रार निवेदन गावातील जानकीराम राठोड याने विभागीय आयुक्त अमरावती व क्रीडा उपसंचालक अमरावती यांना दिले असता त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांना याबाबत चौकशी करून व संबंधितांवर कडक कारवाई करून तसे अहवाल उलट टपाली अमरावती कार्यालयाला सादर करण्यासाठी सूचना करणारे पत्र पाठवले आहे. त्यामुळे अल्पावधीत व्यायामशाळा सुरू होईल, अशी चिन्हे दिसत असल्याचे बोलले जात आहे.
००
कोट
व्यायामशाळेकरिता २ लाख रुपये निधी मिळाला आहे, त्याचे पक्के बांधकाम केले आहे. काही साहित्य आणले आहे. नियमानुसार व्यायामशाळा सुरू आहे. विनाकारण आरोप केले जात आहेत.
वसंत चव्हाण
संस्थाचालक,
संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था खापरदरी