‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळात बाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:33+5:302021-03-16T04:41:33+5:30
राज्यात गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडून शेती उत्पादनावर परिणाम होण्यासह ३४ जिल्ह्यांत ...
राज्यात गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडून शेती उत्पादनावर परिणाम होण्यासह ३४ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भातील पत्रही राज्य मंडळाने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व संबंधितांना पाठविले आहे. फेब्रुवारी, मार्च २०२० च्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या दुष्काळग्रस्त ३४९ तालुक्यांतील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे ‘फ्रीफंड डॉट एमएच-एसएससी डॉट एसी डॉट इन’ आणि ‘फ्रीफंड डॉट एमएच-एचएससी डॉट एसी डॉट इन’ लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लिंक मंडळाच्या ‘महाएचएसएससीबोर्ड डॉट इन’ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धही करण्यात आली आहे. संबंधित प्रणालीच्या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांची यादी तयार करून विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश १० मार्च रोजीच्या पत्रान्वये अमरावती विभागीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना दिले होते, परंतु वाशिम जिल्ह्यातून ही माहिती संकलितच होऊ शकली नाही.