‘लालपरी’ला लागले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:52 PM2019-08-05T14:52:14+5:302019-08-05T14:52:19+5:30
वाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे. या बसगाड्या वारंवार प्रवासादरम्यान मार्गावरच बंद पडत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून, बसफेरी सोडण्यापूर्वी तपासणी होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारीही मंगरुळपीर आगाराची मंगरुळपीर-शिर्डी ही बस १२ किलोमीटर धावल्यानंतर रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना अमरावती-बार्शी या बसमध्ये वाशिमपर्यंत जावे लागले.
वाशिम जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड, हे चार आगार आहेत. या चारही आगारात मिळून दरदिवशी शेकडो बस विविध ठिकाणी धावत असतात; परंतु यातील अनेक बसगाड्यांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे या बसगाड्या आगारातून निघाल्यानंतर मार्गावर मध्येच बंद पडतात. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १५ पेक्षा अधिक वेळा बसगाड्या मार्गावर बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. रविवारीही मंगरुळपीर आगाराची एमएच=४०, वाय-५६१२ क्रमांकाची मंगरुळपीर-शिर्डी ही बस आगारातून वाशिमकडे निघाली. तथापि, धानोरा खु. येथून थोडी पुढे आल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरावे लागले. सुदैवाने १० मिनिटांतच अमरावती आगाराची अमरावती-बार्शी ही बस तेथे आल्यानंतर प्रवाशांना त्यात बसून वाशिमकडे येणे शक्य झाले.
प्रवाशांसह एसटीच्या आर्थिक हानीची जबाबदारी कोणाची ?
राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या मार्गावर बंद पडत असल्याने महत्त्वाचे शासकीय कामकाज, परिक्षेसाठी जाणाऱ्यांचे नुकसान होण्याची भिती असते, तसेच उपचारासाठी जाणाºया रुग्णाचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्याशिवाय बसफेरी बंद पडल्याने संबंधित आगाराचे आणि पर्यायाने एसटीचे आर्थिक नुकसानही होते. या सर्व गंभीरबाबींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या हानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
आमच्या आगारात ५५ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. तथापि, गिअर बॉक्समधील बिघाड किंवा इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.
- विनोद ईलामे
आगार व्यवस्थापक,
वाशिम
आमच्या आगारात ४६ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने गाड्यांत बिघाडोत आहेत. त्याशिवाय इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.
- अकिल मिर्झा
आगार व्यवस्थापक, मंगरुळपीर