रोहणा परिसरात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:40 AM2021-01-20T04:40:13+5:302021-01-20T04:40:13+5:30
तालुक्यातील रोहणा परिसरात वाघ, बिबट्या दिसल्याची चर्चा होती. परंतू, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. १८ जानेवारी रोजी सुखदेव शिंदे हे ...
तालुक्यातील रोहणा परिसरात वाघ, बिबट्या दिसल्याची चर्चा होती. परंतू, याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. १८ जानेवारी रोजी सुखदेव शिंदे हे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतात गस्तीसाठी जात होते. यावेळी त्यांच्यासोबत पाळीव कुत्राही होता. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला चढविल्याने सुखदेव शिंदे भयभीत झाले. बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले. मालकाच्या मदतीसाठी पाळीव कुत्रा धावून आला असता, बिबट्याने कुत्र्यावरही हल्ला चढविला. यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना पुढील उपचारासाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार केल्यानंतर रुग्णाला अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेकापचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी वनविभागाकडे १९ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली.