रस्ता पाहून चाल; नाहीतर खड्ड्यात जाईल पाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:48+5:302021-09-16T04:51:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मालेगाव तालुक्यातील रिधोरा ते मुंगळा हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव तालुक्यातील रिधोरा ते मुंगळा हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दैनावस्थेमुळे ‘रस्ता पाहून चाल; नाहीतर खड्ड्यात जाईल पाय’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. दरम्यान, या रस्त्यासंदर्भात मुंगळा येथील ग्रामस्थांनी आमदार अमित झनक यांना १४ सप्टेंबर रोजी निवेदन देत रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली.
मुंगळा ते रिधोरा हा रस्ता समृद्धी महामार्ग हबमध्ये जाणारा अतिशय महत्त्वाचा आणि जवळचा रस्ता आहे. या रस्त्याने शेतकरी आपल्या शेतातील कोणताही माल हबमध्ये लवकरात लवकर नेऊ शकणार आहेत. या रस्त्याची अवस्था सद्यपरिस्थितीत खराब झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे ‘रस्ता पाहून चाल; नाहीतर खड्ड्यात जाईल पाय’ असे म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. रस्ता खराब असल्याने आंबिया बहाराचा संत्रा पूर्णत: शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सोयाबीन हंगाम सुरू होत आहे. आज या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन काढण्यासाठी हार्वेस्टर, ट्रॅक्टर, थ्रेशर मशीन शेतात कशी न्यायची आणि सोयाबीन घरी कसे आणायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. याकडे आमदार अमित झनक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी मुंगळा येथील शेतकऱ्यांनी केली.
००००००
रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन!
मुंगळा येथील शेतकºयांनी मांगूळ झनक येथे जाऊन आमदार अमित झनक यांच्याशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी पत्र देऊन या रस्त्याचे अंदाजपत्रक बनवून रस्ता खडीकरण व मजबुतीकरण करण्यास मंजुरात द्या, अशी शिफारस केली. हा रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन आमदार झनक यांनी दिली. यावेळी संतोष राऊत, अशोक राऊत, नामदेवराव मोहळे, गणेश मोहळे, सागर राऊत, वसंता राऊत, विवेक शर्मा, मनोजआप्पा महाजन, माणिक घुगे, विलास राऊत, गजानन जगन्नाथ केळे आदी उपस्थित होते.