वाशिम: लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी रविवार, २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत समाजबांधवांच्या विराट विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, भालकी मठाचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, कोरणेश्वर आप्पा महास्वामीजी, बसवब्रिगेडचे संस्थापक अॅड. अविनाश भोसीकर करतील. याबाबत समन्वय समितीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम २५ व २९ नुसार आपली संस्कृती जपण्याचा अधिकार सर्वांना आहे. शासनाने लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता दिल्यास भावी पिढीला शैक्षणिक लाभ मिळतील. विद्यार्र्थ्यांना वेगळी शिष्यवृत्ती, वेगळे वसतीगृह, मोफत कोचिंग, रोजगारभिमुख प्रशिक्षण, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, गॅझेटेड पोस्टसाठी ५० हजाराची मदत, राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना, बिजभांडवल योजना आदी लाभ मिळतील. तसेच मेडीकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज, विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालये, हायस्कुल, प्राथमिक शाळा किंवा स्वतंत्र विद्यापीठ नव्याने सुरु करण्याची परवानगी अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून मिळू शकेल. तसेच लिंगायत धर्माचे मठ, मंदिरे यांना कुळकायदा लावून ते कुणी बळकावू शकणार नाही. पाठ्यक्रमात लिंगायत संस्कृतीचा समावेश होईल. हे लाभ प्राप्त होण्यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मान्यतेची गरज असून या मागणीसाठी यवतमाळ येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व लिंगायत, गवळी, बुरुड, तेली, माळी, देवांग, कोष्टी, वाणी, जंगम आणि इतर लिंगायत समाजातील व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक डॉक्टर, इंजिनिअर, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजीक संघटना, संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
लिंगायत समाजाचा २८ जानेवारीला यवतमाळ येथे महामोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:33 PM
वाशिम: लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी रविवार, २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत समाजबांधवांच्या विराट विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे धर्माला स्वतंत्र मान्यता, अल्पसंख्याक दर्जा मागणीसाठी यवतमाळ येथे महामोर्चाचे आयोजन.सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.