‘लॉकडाऊन’मुळे गावाला गवसला उद्योजकतेचा मूलमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:48+5:302021-06-11T04:27:48+5:30
शेलूबाजार : मनात नवनिर्मितीची रग असली की आपत्तीही इष्टापत्तीत परावर्तित करता येऊ शकते. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार ...
शेलूबाजार : मनात नवनिर्मितीची रग असली की आपत्तीही इष्टापत्तीत परावर्तित करता येऊ शकते. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लहान-मोठे व्यवसाय ठप्प पडले. या संकटात शेतकरी, कामगार हे घटक अक्षरश: देशोधडीला लागले. अशीच काहीशी परिस्थिती वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी गावातील शेतकऱ्यांवरही ओढवली होती. मात्र, ‘गरज ही शोधाची जननी असते’ या वचनाप्रमाणे एका गावातील भूमिपुत्र असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने गावाला स्वयंरोजगाराचा रस्ता दाखवला. लॉकडाऊनमध्ये एकीकडे शेतमाल मातीमोल होत असताना या गावाला आता शेतमालावरील समृद्धीचा नवा राजमार्ग दाखविला आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी गाव सळसळत्या तरुणांचे गाव. मात्र, गावातील हीच तरुणाई लॉकडाऊनमधील परिस्थितीने काहीशी सैरभैर झाली होती. लॉकडाऊन काळात गेल्या वर्षी आणि या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांची मोठी फरफट झाली होती. शेतात उत्पादित केलेल्या शेतमालाला भाव मिळत नव्हता तर दुसरीकडे या शेतमालाला बाजारपेठही मिळत नव्हती. या वेळी हताश झालेल्या गावातील नागरिकांना आशेचा किरण ठरला तो गावच्या मातीत जन्मलेला डॉ. संतोष बोथे हा शास्त्रज्ञ तरुण. संतोष तसा मुंबईत राहून नोकरी करणारा तरुण.
डॉ. संतोष यांनाही लॉकडाऊनमध्ये गावी यावं लागलं. या वेळी गावातील शेतकरी शेतमाल घरीच पडून असल्याने चिंतित होते. गावातील बहुतांश शेती ही ओलिताखाली असलेली. या सगळ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गावातील तरुणाईला एकत्र केले. शेतातील उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून विक्रीचा उद्योग सुरू करण्याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं. गावातील ३५ तरुणांना माहिती देऊन शेतमालापासून विविध पदार्थ निर्मितीचा उद्योग सुरू केला आणि शेतकरी ते उद्योजक या प्रवाहात आणून सोडलं. आज या गावातील अनेक नागरिकांना बोथे यांनी आत्मनिर्भर केलं आहे.
कोण आहेत डॉ. संतोष बोथे :
डॉ. संतोष बोथे हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी या गावचे रहिवासी आहेत. संतोष यांचं घर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचं. संतोष यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात झालं. तर अकरावी-बारावीचं शिक्षण मंगरूळपीरच्या जिल्हा परिषद महाविद्यालयात पूर्ण केलं आहे. त्यांनी बी.एस.सी.ची पदवी अकोल्याच्या आरएलटी महाविद्यालयातून पूर्ण केली आहे. तर पदव्युत्तर शिक्षण नागपूरच्या रायसोनी महाविद्यालय येथे पूर्ण केलं आहे. पीएच.डी. आणि पुढील उच्चशिक्षण इटलीच्या रोम विद्यापीठात पूर्ण केलं आहे. डॉ. संतोष बोथे सध्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील ‘नरसी मोनजी विद्यापीठा’त ‘इंनोव्हेशन हेड’ म्हणून काम करतात.
कोरोना काळात डॉ. संतोष बोथेंच्या संशोधनाची परदेशात भुरळ
डॉ. संतोष बोथे यांच्या ‘आवाजाच्या विश्लेषणावरून रोगनिदान’ या पद्धतीचा वापर सध्या इटली आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. इटली आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी या पद्धतीचा वापर करीत ‘कोविड-१९’ आजाराचे निदान करणे सुरू केले आहे. इटलीमधील रोम शहरातल्या ‘तोर वेरगाटा विद्यापीठा’सह आणि तेथील रुग्णालयात या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या उपकरणाचा आधार घेत ३०० लोकांवर याचा प्रयोग करण्यात आला. यात ९८ टक्के लोकांच्या रोगनिदानाचे निकाल अचूक आलेत.
अनेक परदेशी विद्यापीठे ‘कोविड-१९’च्या चाचणीसाठी डॉ. बोथे यांच्या संशोधनावर आधारित ‘व्हॉईस-बेस्ड मोबाइल ॲप’ तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पद्धतीमध्ये रुग्णांना पूर्वनियोजित स्क्रिप्ट देण्यात येते. त्याचं वाचन करताना त्यांचे आवाज रेकॉर्ड केले जातात. नंतर या नमुन्याचे ‘आर्टीफिसिअल इंटेलिजन्स’ ही पद्धती वापरून विश्लेषण करून रोगनिदान केले जाते.
शेतातील उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारपेठेमध्ये कमी मिळणारा दर आणि कोरोना काळात उचल कमी असल्याने शेतमालाचे नुकसान होत असे. मात्र, संतोष बोथे यांच्या मार्गदर्शनामुळे उद्योजकतेकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी स्वत:च वेबपोर्टल तयार केले. आता वेबसाईटच्या माध्यमातून गावच्या मातीत पिकवलेलं पीक देश आणि विदेशात पोहोचविण्यासाठी मदत मिळणार आहे. तर गावातील महिला बचत गटांनाही कोरोनाच्या फावल्या वेळात उद्योग निर्मिती करून शेतातील शेतमालावर प्रक्रिया करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आज ३५ विविध पदार्थ निर्माण केले जात आहेत. याची विक्री अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या भागांत केली जाते. त्यामधून दोन महिन्यांत अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
ही उत्पादनं केली तयार :
इटली कांदा : कांदा पावडर, कांदा फ्लेक्स, कांदा पेस्ट, कांदा रेडी मिक्स
लसूण : लसूण पावडर, लसूण पेस्ट
आंबा : आंबा ज्युस, आंबा लोणचे (६ प्रकारचे), आमसूल, खुला, आंबा पापड, आंबा आइसक्रीम, गूळ-आंबा, साखर आंबा
टोमॅटो : टोमॅटो पावडर, टोमॅटो प्युरी, टोमॅटो रेडी कूक सूप, टोमॅटो चटणी
अद्रक : सुंठ, अद्रक पावडर
गुळवेल : गुळवेल स्टिक, गुळवेल पावडर, गुळवेल सत्त्व
सोयाबीन : सोया पनीर (टोफू), सोया बर्फी, सोया आइसक्रीम, सोया स्टिक, सोया वडी, सास
शेवगा : शेवगा पावडर, शेवगा लीफ पावडर
सध्याच्या कोरोना काळात संपूर्ण वातावरण अंधारून गेल्यासारखं आहे. मात्र, या अंधाऱ्या वाटेवर हसरे दुवे शोधणारे डॉ. संतोष बोथेंसारखे तरुण आणि गोगरी गावातील तरुणाईसारखे अनेक आहेत. गावागावांत असं ‘गोगरी मॉडेल’ उभं राहिलं तर अनेक गावं अन् तरुणाई स्वयंपूर्ण होईल.