Lockdown : वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजुरांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:30 AM2020-05-18T11:30:00+5:302020-05-18T11:30:23+5:30
वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : परराज्य व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले मजूर गेल्या काही दिवसांपासून मिळेल त्या वाहनांनी आपापल्या गावी परतत आहेत; मात्र सर्वच वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे दाटीवाटीने वाहनांमध्ये कोंबून बसणारे अनेक मजूर ना तोंडाला मास्क लावत आहेत, ना ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळत आहेत.
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्चपासून देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू केला. सोबतच रेल्वे, बस यासह इतर सार्वजनिक वाहतूकीवर बंदी लादली. परिणामी, मोलमजूरीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये स्थलांतरीत झालेले कामगार, मजूरांचे कुटूंब त्याचठिकाणी अडकून पडले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शासनाने ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता देत मजूर, कामगारांना आपापल्या गावी परतण्याची परवानगी दर्शविली. यामुळे एकाचवेळी अनेक राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मजूरांचे जथ्थेच्या जथ्थे मिळेल त्या वाहनांमध्ये बसून आपापल्या गावी रवाना होताना दिसत आहेत; मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा धोका झपाट्याने बळावत असतानाच ट्रक, कंटेनर यासह इतर वाहनांच्या आत व टपावर बसून क्षमतेपेक्षा अधिक मजूर प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, केनवड मार्गावर दिसून येत आहे. याहीपेक्षा भयावह स्थिती ही आहे, की दाटीवाटीने वाहनांमध्ये बसणाºया अनेक मजूर, कामगारांकडून ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसून अनेकजण तोंडाला मास्क देखील लावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. मजूर प्रवाशांनी खचाखच भरून धावणाºया वाहनांना अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. असे असताना पोलिस प्रशासनाकडून मात्र या प्रकाराला मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या संकट काळात त्रस्त झालेले मजूर आपापल्या गावी पोहचणे महत्वाचे आहे; मात्र नियमापेक्षा अधिक वाहतूक करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलिस प्रशासनाकडूनही याबाबत कारवाई करण्यात येईल.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम