मैराळडोह ग्रामपंचायतचे जळालेले वादग्रस्त ‘रेकॉर्ड’ सापडले!
By admin | Published: June 1, 2017 01:55 AM2017-06-01T01:55:32+5:302017-06-01T01:55:32+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील तत्कालीन ग्रामसेवक संजय शेळके यांनी १० मार्च रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील तत्कालीन ग्रामसेवक संजय शेळके यांनी १० मार्च रोजी वाशिम शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पोलिसांनी जप्त केलेले ग्रामपंचायतचे रेकॉर्ड ‘जळाले’ असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने कळविले होते. सदर रेकॉर्ड आता सापडल्याने संबंधित कर्मचाऱ्याचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला. दरम्यान, ३१ मे रोजी न्यायालयाचे आदेशाप्रमाणे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सदर दप्तर सुपूर्द केले.
सन २०१६ मध्ये मैराळडोह (ता. मालेगाव जि. वाशिम ) येथील ग्रामसेवक संजय शेळके कर्तव्यावर होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून ग्रामविकासाची खोटी कामे दाखवून देयके काढली, यासह विविध गैरप्रकाराचा ऊहापोह त्यांनी ‘सुसाईट नोट’ मध्ये केला होता. त्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने घटनेचे तपास अधिकारी बहुरे यांनी मैराळडोह ग्रामपंचायतचे संपूर्ण रेकॉर्ड जप्त केले होते.
मागील एक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये रेकॉर्ड नसल्यामुळे सन २०१५-१६ ची कर आकारणी, गावातील दाखले, घराची कर पावती आदी महत्त्वाचे दस्तावेज नागरिकांना देता येत नव्हते. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याने सदर रेकॉर्ड जळाल्याचे पंचायत समितीला कळविले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दप्तर मिळावे, यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने न्यायालयामध्ये अर्ज केला होता. या अर्जावर न्यायालयाने ११ मार्च २०१७ रोजी सुनावणी केली. या सुनावणीमध्ये विद्यमान न्यायालयाने वाशिम शहर पोलिसांना जप्त केलेले रेकॉर्ड परत करण्याचा आदेश दिला. यासंदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची भेट घेऊन जप्त केलेल्या रेकॉर्डबद्दल माहिती दिली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी तत्काळ रेकॉर्डचा तपास करण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे यांना सूचना केल्या. या सूचनेनुसार चक्रे, तत्कालीन तपास अधिकारी बहुरे व ठाणेदार शिरीष मानकर यांनी रेकॉर्ड रूमची पुन्हा पाहणी केली असता एका कपाटाच्या मागे ‘रेकॉर्ड’ मिळून आले. सदर रेकॉर्ड ३१ मे रोजी पोलीस अधीक्षक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी चक्रे, ठाणेदार मानकर यांनी ग्रामविकास अधिकारी भुरकाडे यांचेकडे सुपूर्द केले.