पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:16 PM2019-07-17T15:16:16+5:302019-07-17T15:16:21+5:30

मानोरा : बंजारा समाजाची काशी पोहरादेवीत गुरु पोर्णिमेनिमित्त १६ जुलै रोजी लाखो भाविकांनी पायदळ दिंड्यांसह हजेरी लावून, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी व धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले

millions of devotees gathered in Poharadevi | पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक!

पोहरादेवीत गुरुचरणी लाखो भाविक नतमस्तक!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : बंजारा समाजाची काशी पोहरादेवीत गुरु पोर्णिमेनिमित्त १६ जुलै रोजी लाखो भाविकांनी पायदळ दिंड्यांसह हजेरी लावून, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी व धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. आई, वडीलांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचे प्रतिपादन यावेळी धर्मगुरू संत रामराव महाराज यांनी केले.
गुरू पोर्णिमेचे औचित्य साधून गेल्या तीन दिवसांपासून लाखो भाविक दिंड्यांसह पोहरादेवीत दाखल झाले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत १६ जुलै रोजी पहाटे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे विधीवत मंत्रोपचारात पुजन व आरती करण्यात आली. महाराजांच्या हस्ते भोग (प्रसाद) दिल्यानंतर लाखो भक्त व भाविकांना आशीर्वाद देण्याकरिता संत रामराव महाराज सभास्थळी दाखल झाले. यावेळी संत रामराव महाराज म्हणाले की, आई वडीलांची सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. युवकांनी व्यसनांपासून दुरु राहून आई वडीलांची सेवा करावी, असा उपदेशही त्यांनी दिला. नष्ट होत चाललेली वनसंपदा अबाधित ठेवण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहनही रामराव महाराज यांनी केले.
यावेळी जमलेल्या लाखो जनसमुदाकडून रामराव महाराजांचा जयजयकार होत होता. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तत्पुर्वी सकाळी देशभरातील भाविकांचे लोंढे पोहरादेवीत दाखल होताच, मंदिराकडे येणारी वाहने जागोजागी लावल्यामुळे भाविकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. पोहरादेवी येथील विकास कामांची उणीव जाणवत होती. अनेक भाविकांनी रात्र उघडयावर काढावी लागली. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसोबतच इतरही सुविधांचा अभाव जाणवत होता.
गुरुपूजन सोहळयासाठी महंत बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, नेहरु महाराज, बदया नायक कर्नाटक, लालसिंग महाराज, राजाराम महाराज, रमेश महाराज, जगन्नाथ मास्तर, जानुसिंग महाराज, टी.आर. महाराज बराकर आडे, महंत संजय महाराज, मनीष महाराज, भक्तराज महाराज, रामप्रसाद बोर्डीकर जिंतुर, माजी जि.प. अध्यक्ष राहूल ठाकरे, डॉ.श्याम जाधव, राहूल महाराज, शेखर महाराज, गोपाल महाराज यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: millions of devotees gathered in Poharadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.