लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा महिला व बालविकास अधिकाºयांच्या सतर्कतेने जिल्ह्यातील दापुरी खु. (ता.रिसोड) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात १४ मे रोजी यश मिळाले. दरम्यान, कुटूंबियांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत मुलीच्या पालकांकडून मुलगी १८ वर्षाची होईस्तोवर विवाह न करण्याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांना चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून एका व्यक्तीने संपर्क साधत रिसोड तालुक्यातील दापुरी खु. येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १४ मे रोजी विवाह लावून दिला जात असल्याची माहिती दिली. त्यावरून राठोड यांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, चाईल्ड लाईन, वाशिमचे महेश राऊत, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक प्रमोद भगत, रिसोड तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी घुगे, संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, संबंधितांनी विवाहस्थळी पोहचून बालविवाह उधळून लावला. यावेळी मुलीच्या कुटूंबियांचे समुपदेशन करून मुलगी १८ वर्षाची होईस्तोवर विवाह न करण्यासंबंधी पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.
अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 4:54 PM