वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन परजिल्ह्यातील १० विशेष पथकाद्वारे या कामांची चौकशी झाली. अडीच महिन्यांपूर्वी चौकशी पथकाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे सविस्तर अहवालही सादर केला. परंतू, अद्याप कारवाईचा मुहुर्त निघाला नसल्याने ‘रोहयो’ घोटाळ्यातून संबंधितांना ‘क्लिन चीट’ तर दिली जात नाही ना? अशी शंका वर्तविण्यात येत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये शेततळे, फळबाग लागवड, पाणंद रस्ते, वृक्षारोपण यासह विविध प्रकारची कामे करण्यात आली. विविध कामांमध्ये बोगस मजूर दाखवून पैसे काढणे, मशिनद्वारे कामे करणे, अर्धवट काम करून पूर्ण कामाची देयके काढणे यासह या कामांमध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तांकडे केल्या होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्षही वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि ‘लोकमत’चे वृत्तांकन याची दखल घेत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डिसेंबर २०१९ मध्ये या घोटाळ्याच्या चौकशीसाठी यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले १० विशेष पथक गठीत करीत चौकशीचा अहवाल विनाविलंब सादर करण्याचे निर्देशही दिले होते. या पथकांनी ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी करीत फेब्रुवारी २०२० मध्ये संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. तोटावार यांनी हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस हा अहवाल पुढील कार्यवाहीसाइी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. तेव्हापासून या अहवालावर कोणतीही कार्यवाही नसल्याने उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे. रोहयो घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणार की क्लीन चीट मिळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामांचा चौकशी अहवाल जुलै महिन्यात प्राप्त झाला. या अहवालाची छाननी सुरू आहे. यानंतर वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाइल.- कालिदास तापीप्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारीपंचायत विभाग, जिल्हा परिषद वाशिम